Pune Crime : वीज कनेक्शन तोडण्याची भीती घालत महिलेला १ लाखाचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 01:09 AM2022-11-05T01:09:36+5:302022-11-05T11:20:02+5:30
एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस...
पुणे : मी महावितरणमधून अधिकारी बोलत आहे. तुमचे वीज बिल भरले नसल्याने रात्री तुमचे कनेक्शन तोडले जाईल. ते तोडायचे नसल्यास या क्रमांकावर फोन करा, असे सांगत सायबर चोरट्यांनी एका महिलेस एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती. वीज बिल भरले नाही. आज रात्री ९ वाजेपर्यंत बिल न भरल्यास वीज कापण्यात येईल, अशी भीती चोरट्याने महिलेला घातली.
महिलेने चोरट्याच्या बतावणीवर विश्वास ठेवला. चोरट्याने महिलेला टीम व्ह्युअर नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने ॲप डाऊनलोड केल्यानंतर तिच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने लांबवली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.