राज्यात होणार १ लाख प्रशिक्षित भूजल स्वयंसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:43+5:302021-06-16T04:15:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालय सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात १ लाख प्रशिक्षित भूजल संवर्धन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालय सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात १ लाख प्रशिक्षित भूजल संवर्धन स्वयंसेवक तयार करणार आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत भूजल संवर्धन, सरंक्षण जागरूकता वाढावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रत्यक्ष कृती व्हावी या विचारातून संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात झाली असून राज्याच्या प्रत्येक विभागात हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन सुरू आहे. पदवी, पदव्युत्तर ५० हजार विद्यार्थी व ग्रामपंचायत, ग्राम पाणीपुरवठा, महिला बचतगट, पाणी वापर संस्था यातील ५० हजार कार्यकर्ते अशा १ लाख जणांंना भूजलासंबधीची सर्व शास्त्रीय माहिती यात देण्यात येत आहे.
डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले की कार्यालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिक, अनुभवी पदाधिकारी हे प्रशिक्षण देतात. त्यामध्ये विहीर पुनर्भरण, विंधनविहीर पुनर्भरण व छतावरील पाण्याची साठवणूक यावर भर आहे. जिल्ह्याची भौगोलिक जलस्थिती, जलव्यवस्थापन, वापर ताळेबंद याचीही जोड देण्यात आली आहे.
प्रशिक्षणानंतर लगेचच कृती कार्यक्रम देऊन काही दिवसांनी त्याची माहितीही घेतली जाते. आतापर्यंत ५२ प्रशिक्षणे झाली असून त्यातून साडेतीन हजार स्वयंसेवक प्रशिक्षित झाले आहेत. आता याचा वेग वाढवण्यात येत असून जुलैअखेरीस राज्यात १ लाख प्रशिक्षित स्वयंसेवक तयार करण्याचा संकल्प असल्याचे डॉ. कलशेट्टी म्हणाले.