देशातून आतापर्यंत १० लाख टन साखर निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:13 AM2021-02-27T04:13:30+5:302021-02-27T04:13:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंटेनरचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर निर्यातीत अडचणी येत असल्याची तक्रार वेस्ट इंडियन शुगर असोसिएशनच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंटेनरचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर निर्यातीत अडचणी येत असल्याची तक्रार वेस्ट इंडियन शुगर असोसिएशनच्या (विस्मा) बैठकीत करण्यात आली. केंद्र सरकारकडे याविषयी मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इथेनॉलचे टँकर ऑइल कंपन्यांकडून स्वीकारले जात नसल्याबाबतही केंद्राला कळवण्याचे ठरले.
पश्चिम भारतातील खासगी साखर कारखान्यांचे ही संघटना प्रतिनिधित्व करतो. शिवाजीनगरच्या साखर संकुलमधील संघटनेच्या कार्यालयात ही बैठक झाली. संघटनेचे अध्यक्ष बी. बी. चौगुले अध्यक्षस्थानी होते. संचालक रणजित मुळे, राहुल घाटगे, संजय शिंदे, बजरंग सोनवणे, कार्यकारी संचालक अजित चौगुले आदी बैठकीस उपस्थित होते.
राज्यात २४ फेब्रुवारी अखेर ८०२ लाख टन उसाचे गाळप झाले, त्यातून ८२ लाख टन साखर निर्मिती झाल्याची देण्यात आली. सोलापूर, विदर्भामधील हंगाम फेब्रुवारी अखेर, कोल्हापूर, मराठवाडा मार्चअखेर, पुणे, सांगली, अहमदनगरचा एप्रिल अखेर विदर्भातील सुरू राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
निर्यातीला सध्या चांगला वाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दरही मिळतो आहे. आतापर्यंत ३५ लाख टन साखरेचे करार झाले असून त्यातील १० लाख टन साखर निर्यात झाली आहे. साखर निर्यातीसाठी आवश्यक कंटेनरचा तुटवडा असल्याने निर्यातीचे वेळापत्रक बिघडते. ब्राझीलची साखर बाजारात येण्याआधी भारताची साखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचल्यास आर्थिक फायदा होईल. त्यामुळे कंटेनरच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारला त्वरित कळवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती केली, मात्र आता ऑइल कंपन्या इथेनॉल घेत नाहीत. यातून कारखान्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याविषयी केंद्र सरकारला कळवण्याचा निर्णय घेण्यात आला.