Schools: १ महिन्याने शिक्षण विभागाला जाग अन् पालकांच्या डोक्याला ताप, ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:56 PM2024-07-11T12:56:32+5:302024-07-11T12:56:52+5:30
अनधिकृत शाळांमध्ये जर मुलांनी प्रवेश घेतला असेल तर त्यांच्या पुढील भवितव्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होतोय
पुणे : शाळा सुरू होऊन महिना होत आला असताना खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. पुणे, पिंपरीसह जिल्ह्यात तब्बल ४९ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या शाळांमध्ये जर मुलांनी प्रवेश घेतला असेल तर त्यांच्या पुढील भवितव्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पडला आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये अनधिकृत शाळांची यादी जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून पालकांची फसवणूक हाेणार नाही अन् विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही; मात्र आता शिक्षण विभागाने नवा पायंडा पाडला असून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करायची.
यंदा शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली नव्हती. ज्यावेळी हा विषयच चर्चेचा होऊ लागला त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली; मात्र यात मोठा घोळ आहे. यादी असणाऱ्या अनेक शाळांचे वर्ग सुरू असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे ही यादी जाहीर करून शिक्षण विभागाने पालकांच्या डोक्याला ताप करून ठेवलाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यादीमध्ये अशी काही नावे आहेत की त्या शाळांची नावे वर्षानुवर्षे येत आहेत. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत यावेळी कमी आहेत; पण प्रश्न उरतो तो खरंच उरलेल्या शाळांकडे परवानगी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
या आहेत अनधिकृत शाळा
किड्जी स्कूल, (शालीमार चौक, दौंड, जि. पुणे), जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास (कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे), यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल (सोनवडी, ता. दौंड, जि. पुणे) ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, (उंड्री, ता. हवेली, जि.पुणे), नारायणा इ टेक्नो स्कूल (वाघोली, ता. हवेली, जि. पुणे), द गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल ( ता. हवेली, जि. पुणे.) फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल (मांजरी बु., ता. हवेली, जि. पुणे.), इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल (फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे. इ. ६ वी ते इ. ८ वी वर्ग अनधिकृत), व्ही. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल (भेकराईनगर, ता. हवेली, जि. पुणे), द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), रामदास सिटी स्कूल रामदरा (लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे), मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय (कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल (जांभुळवाडी, ता. हवेली, जि. पुणे), भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (मोई, ता. खेड, जि. पुणे), जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल (खामशेत, ता. मावळ, जि. पुणे), श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर (गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे), व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, (नायगांव, ता. मावळ, जि. पुणे), किंग्ज वे पब्लिक स्कूल, (रायवूड, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे), रुडिमेन्ट इंटरनॅशनल स्कूल (माण तालुका मुळशी, जि. पुणे), एंजल इंग्लिश मीडियम हायस्कूल (गणेश नगर दत्तवाडी नेरे तालुका-मुळशी, जि. पुणे), चाणक्य ज्युनिअर कॉलेज (पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे), महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल (खुबवली, ता. मुळशी, जि. पुणे) अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल (ता. मुळशी, जि. पुणे), पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल (पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे), इलाईट इंटरनॅशनल स्कूल (ता. मुळशी, जि. पुणे), संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल (ता. मुळशी, जि. पुणे), श्रीविद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल (घोटावडे फाटा पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे), पोदार इंटरनॅशनल स्कूल (ताथवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे (सीएआई), ता. मुळशी,), एल प्रो इंटरनॅशनल स्कूल (हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे), माउंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल (नेरे, ता. मुळशी, जि. पुणे), दिल्ली पब्लिक स्कूल (हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे), सरस्वती विद्या मंदिर (पिरंगुट), श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर, ता. पुरंदर, जि. पुणे), दारुल मदिना एज्युकेशन फौंडेशन मुंबई संचलित दारुल मदिनाह स्कूल,( पारघेनगर,कोंढवा खु. पुणे (इंग्लिश)) तकवा एज्युकेशन ट्रस्ट संचलित टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब ( कोंढवा खु. पुणे (इंग्लिश)), सेवा फौंडेशन पुणे संचलित लेगसी हाय स्कूल (अश्रफ नगर कोंढवा बु. पुणे), केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कूल (महंमदवाडी रोड पुणे - २८), पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, (गांधीनगर पिंपळेनिलख ) श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, (विशालनगर, पिंपळेनिलख), आयडीएल इंग्लिश स्कूल (जवळकरनगर, पिंपळेगुरव) सपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल ( चिंचवडेनगर, पुणे ३३), लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल ( चिंचवडेनगर, पुणे ३३), नवजित विद्यालय (लक्ष्मीनगर वाल्हेकरवाडी), किड्सजी स्कूल (पिंपळेसौदागर), एम.एस.स्कूल फॉर किड्स, (सांगवी) क्रिस्टल मॉर्डन स्कूल, (वडमुखवाडी), माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, (कासारवाडी) ऑचिड इंटरनॅशनल स्कूल,( चिंचवड).
यादीत घोळ
शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये दौंड शहरातील शालिमार चौकात किडजी स्कूलच अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे तर दुसरीकडे जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशू विकास कासुर्डी ही शाळा बंद होऊन साधारण दोन-तीन वर्षे झाली आहेत. या शाळेच्या संस्थाचालकांनी दंडही भरला असून, आता ही बंद असतानाही या यादीत शाळेचे नाव आले आहे. एवढेच नाही तर काही शाळा स्थलांतरित झाल्या असल्या तरी त्यांचा जुनाच पत्ता आहे. त्यामुळे केंद्रप्रमुखांनी अनधिकृत शाळा शोधल्या की जुन्याच यादीतील काही नावे नव्या यादीत दिली आहे. असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने जी यादी जाहीर केली त्यामध्ये सुरुवातील ५० शाळा म्हटले आहे. वास्तविक, ४९ शाळा अनधिकृत असल्याचे यादी पाहिल्यानंतर निदर्शनास येते. त्यामुळे नक्की शाळा किती आहेत, हाही एक प्रश्नच आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरकारची कोणतीही मान्यता अथवा परवानगी न घेता सुरू असल्याचे आढळले. शाळा बंद न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. तरीही शाळा बंद न केल्यास शाळेची मालमत्तेवर बोजा चढविला जाईल. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. -संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याच वेळ लागला आहे. परंतु, पालकांनी घाबरण्याचे काही एक कारण नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यादीमध्ये अस्तित्वात नसणाऱ्या तसेच स्थलांतर झालेल्या शाळांची नावे आली असतील तर पुन्हा एकदा यादी तपासून तसेच सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा अनधिकृत शाळा शोधण्यात येतील. -संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे