PMC | पुणे महापालिकेने केल्या १ हजार ३५५ मिळकती सील; ९२ कोटींची थकबाकी वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:31 AM2022-09-28T10:31:06+5:302022-09-28T10:33:01+5:30
पालिकेने केली ९२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल...
पुणे : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने थकबाकी असलेल्या १ हजार ३५५ मिळकती सील करून, ९२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. मिळकत कर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, इमारतींच्या टेरेसवर आणि साइड आणि फ्रंट मार्जिनमध्ये अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या २७२ हॉटेल व रेस्टॉरंटवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. या मिळकतींना तीन कर आकारून दंड वसूल करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
बाणेर येथील एका इमारतीच्या टेरेसवरील (रूफ टॉप हॉटेल) रेस्टॉरंटला आग लागली होती, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर असलेल्या रेस्टॉरंटच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून मिळकतकर विभागाच्या पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील रूफ टॉप हॉटेलसह फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील हॉटेलवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना तीनपट कर लावून तो वसूल करावा, असेही सूचित केले होते.
या आदेशानुसार महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने शहरातील रूफ टॉप हॉटेलसह फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील २७२ हॉटेल व रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे.