Pulse Polio| 'पल्स पोलिओ' लसीकरणासाठी पुणे शहरात १ हजार ४०० बूथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:14 PM2022-02-26T15:14:08+5:302022-02-26T15:14:22+5:30
या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना पोलिओ डोस देणे बंधनकारक
पुणे : 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-२०२२' अंतर्गत, येत्या रविवारी ( दि. २७ फेब्रुवारी) ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण आयोजित केले आहे. याकरिता पुणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभागनिहाय १ हजार ४०० पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत.
या मोहिमेमध्ये शहरातील ३ लाख ११ हजार बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी बूथ द्वारे लसीकरण पार पडल्यावर, सोमवार दि. २८ फेब्रुवारी ते शनिवार दि. ५ मार्च पर्यंत पाच दिवस सर्व प्रभागनिहाय आय.पी.पी.आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याद्वारे घरोघरी जाऊन ० ते ५ वयोगटातील बालकांनी पोलिओ डोस घेतला आहे की नाही याची माहिती घेऊन लस न घेतल्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. या काळात रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत राहणार आहे.
सदर मोहिमेसाठी ४ हजार ५५ स्वयंसेवक, २८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, तसेच पुणे महापालिकेचे ९० डॉक्टर्स, ५ विभागीय अधिकारी, पुणे महापालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटरीयन्स, नर्सेस कॉलेजचे विदयार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यतिरीक्त महिला बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक, आशावर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना पोलिओ डोस देणे बंधनकारक असून, यावर्षी सदर मोहिम एकाच सत्रात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे अशा जोखमीच्या भागातील बालकांना लस देणेकरीता यावर्षी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.