Cyber Fraud: पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सायबर चोरीच्या १० घटना; कोट्यावधी रुपयांची फसवणूक

By नितीश गोवंडे | Updated: December 19, 2024 16:48 IST2024-12-19T16:47:41+5:302024-12-19T16:48:19+5:30

सर्वसामान्य सायबर चोरांच्या अमिषाला बळी पडत असल्याने त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे

10 cyber theft incidents at different places in Pune; Fraud worth crores of rupees | Cyber Fraud: पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सायबर चोरीच्या १० घटना; कोट्यावधी रुपयांची फसवणूक

Cyber Fraud: पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सायबर चोरीच्या १० घटना; कोट्यावधी रुपयांची फसवणूक

पुणे : सायबर चोरांच्या विविध अमिषाला बळी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. शहरात बुधवारी (दि. १८) दाखल वेगवेगळ्या दहा घटनांमध्ये कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये ५२ वर्षीय फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत ४ लाख ८ हजार ४९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये ५६ वर्षीय फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये उत्तम कमाई करून देतो असे सांगत तसेच लोणावळा येथे फार्म हाऊस विकत देतो असे सांगत १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये स्टील व इतर मेटल मध्ये धातू खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर विश्वासघात करत स्वत:चा आर्थिक फायदा करण्यासाठी दिलीप बोथरा या व्यक्तीने फिर्यादी यांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये २८ वर्षीय फिर्यादी यांना मुंबई क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगत मनी लॉड्रिंगच्या केसमध्ये अरेस्ट करण्याची भीती दाखवत २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. 

- चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये १८ वर्षीय फिर्यादीची टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवत ४ लाख ३० हजार ३०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याशिवाय एका ५४ वर्षीय फिर्यादीला देखील शेअर ट्रेडिंग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून १० लाख ६९ हजार १४९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच पद्धतीने लोणीकंद (वाघोली) पोलिस ठाण्यात दाखल ३६ वर्षीय फिर्यादी यांची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- कोंढवा पोलिस ठाण्यात ५२ वर्षीय फिर्यादी यांची सायबर चोरांनी खोटी ऑर्डर घेऊन १६ लाख ७९ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- हडपसर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये ६२ वर्षीय ज्येष्ठ इसमाने आजारी मांजरासाठी सिंगापूर, हाँगकाँग, चीन व जपान येथून कोणी येत असेल तर औषध घेऊन यावे असे सोशल मीडियावर टाकले होते. सायबर चोरांनी आम्ही औषध घेऊन येतो सांगत त्यांची १६ हजार ७२० रुपयांची फसवणूक केली. 

- मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये ४१ वर्षीय इसमाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने ३ लाख ९८ हजार रुपयांंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 10 cyber theft incidents at different places in Pune; Fraud worth crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.