दगडफेकप्रकरणी दहा जणांना कोठडी
By admin | Published: April 24, 2017 05:06 AM2017-04-24T05:06:51+5:302017-04-24T05:06:51+5:30
पूर्वीच्या भांडणांवरून तरुणाच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दहा जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता
पुणे : पूर्वीच्या भांडणांवरून तरुणाच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दहा जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
अभिजित तापकीर (वय २४), ऋषिकेश तापकीर (वय १९), शुभम बुर्डे (वय २१), ऋषिकेश ताम्हाणे (वय १९), राकेश तापकीर (वय १९), सत्यम तापकीर (वय १९), रविराज तापकीर (वय २२), ऋषिकेश रासकर ( वय १८), अक्षय रासकर (वय २१) आणि प्रमोद शिवरकर (वय २०, सर्व राहणार चऱ्होली) असे कोठडी देण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी हिराबाई ताराचंद खेसे (वय ६५, रा. खेसेआळी, लोहगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आणखी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार लोहगावमधील खेसेआळी येथे २२ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. हिराबाई यांचा पुतण्या मयूर खेसे यांच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळे शिवराज आणि त्याच्या इतर साथीदारांनी मयूर खेसे याच्या घरावर हल्ला करून दगडफेक केली. घरावर दगडफेक करून घराच्या काचा फोडून पार्किंगमधील पाच वाहनांचे तसेच घराच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले. शिवराज आणि त्याच्या साथीदारांनी मयूर खेसे याच्या घरात घुसून घरातल्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन महिलांचा विनयभंग केला.
हल्लेखोरांनी महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असे एकूण १ लाख ८३ हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारी वकील एस. जे. बागडे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.