पुण्यातील राजेंद्रनगरमध्ये १० कुत्र्यांचा मृत्यू; विष घालून मारल्याचा संशय, कावळेही मेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:56 PM2018-01-11T13:56:50+5:302018-01-11T13:59:58+5:30
राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे : राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषमध्ये काही कावळेही मेलेले आढळून आल्याने नेमका काय प्रकार झाला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे़त
राजेंद्रनगरमध्ये पीएमसी कॉलनीतील इमारत क्रमांक १, २ व ३ च्या आसपास ही कुत्री मरुन पडली असल्याचे तेथील रहिवाश्यांना आज सकाळी आढळून आले़ तेथेच काही कावळेही मरुन पडले होते.
याबाबत राहुल मानकर यांनी सांगितले, की बुधवारी ३ कुत्री मरुन पडल्याचे आढळून आले होते़ लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ परंतु, आज १० पेक्षा अधिक कुत्री मरुन पडली असल्याने लोकांमध्ये त्याची एकच चर्चा होऊ लागली आहे़ या भागातील कचरा कुंड्या काढून टाकल्या आहेत़ तरीही काही ठिकाणी कडेलाच कचरा टाकला जातो़ या कचऱ्याजवळ काही कुत्री मरुन पडली असून तेथेच कावळेही मरुन पडले आहेत़ तर काही कुत्री तेथून काही अंतरावर जाऊन मरुन पडल्याचे दिसून आले आहे़ हा एकंदर प्रकार पाहता कोणीतरी विष घालून कुत्र्यांना मारल्याचे दिसून येत आहे़ याप्रकरणी आम्ही विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत़