मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० तास ‘केमिकल लाेचा’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:19 AM2022-03-27T09:19:39+5:302022-03-27T09:20:23+5:30
वाहतुकीचा खाेळंबा, थर काढताना कर्मचारी मेटाकुटीला, अन्नपाण्याविना प्रवासी बेहाल
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा, खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली शनिवारी पहाटे केमिकलचा टँकर उलटल्याने प्रवाशांचे मेगा हाल झाले. तब्बल १० तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला. लहान मुले आणि आजारी व्यक्तींचे तर खाण्यापिण्यावाचून हाल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला टँकर उलटून केमिकल रस्त्यावर सांडले. नंतर त्याचा मेणाप्रमाणे थर तयार झाल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन पूर्ण बंद ठेवावी लागली.
टॅंकर उलटला अन्...
केमिकलवर माती व क्रश सॅण्ड टाकण्यात आले. टँकर जेसीबी व अन्य मशीनने बाजूला काढला. सकाळी दहा वाजेपर्यंत एक्स्प्रेस-वे पूर्ण बंद होता. केमिकलचा थर निघत नसल्याने दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली. दीडच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून वाहने संथ गतीने जात होती.
दोन्ही मार्गिका बंद होण्याची पहिलीच वेळ
nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूंच्या गाड्या सर्वांत जास्त वेळ जाम होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
nउन्हाळ्याचे दिवस असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.
nघाट चढताना अनेक गाड्या बंद पडल्या होत्या, त्यामुळेदेखील वाहतुकीला अडथळे येत होते. अखेर १० तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.