एलबीटी उत्पन्नात दहा टक्के वाढ
By admin | Published: November 20, 2014 04:26 AM2014-11-20T04:26:13+5:302014-11-20T04:26:13+5:30
औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने वाहन उद्योगांमध्ये तेजीचे वातावरण असल्यामुळे या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) उत्पन्नात सरासरी दहा टक्के वाढ झाली
पिंपरी : औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने वाहन उद्योगांमध्ये तेजीचे वातावरण असल्यामुळे या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) उत्पन्नात सरासरी दहा टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच टॉप टेन कंपन्यांच्या एलबीटी भरण्यात गतवर्षीच्या जकात उत्पन्नाच्या तुलनेत १६ कोटी ५४ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
जकातीला पर्याय म्हणून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू झाला. बहुसंख्य व्यापाऱ्यांनी या कराच्या विरोधात असहकार पुकारल्याने एलबीटीचे अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झाले होते. औद्योगिक मंदी, बाजारपेठेत वाहन उत्पादनांच्या मागणीत झालेली घट यामुळे यामुळे एलबीटी महसुलाचे उद्दिष्ट गाठणे अवघड झाले होते. परंतु महापालिकेला उत्पन्न मिळवून देणारे औद्योगिक क्षेत्रातील टॉप टेन उद्योग-व्यवसाय यांच्याकडून एलबीटीचा अपेक्षित भरणा झाला. या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, एक्साईड, थरमॅक्स,सेन्च्युरी एन्का,एसकेएफ, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन आॅईल,सॅन्डविक एशिया,अल्फा लवाल, अॅटलास कॉप्को या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून गतवर्षी १५१ कोटी ३५ लाख ७५ हजार ७६० रूपये उत्पन्न मिळाले होते, ते या आर्थिक वर्षात १६७ कोटी ९० लाख ८ हजारांवर गेले आहे.
२०१३-१४ आर्थिक वर्षात एलबीटीद्वारे ८५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. जकातीच्या तुलनेत एलबीटी उत्पन्नात तब्बल ३०६ कोटी रुपयांची घट झाली. २०१२ - १३ या आर्थिक वर्षात जकातीद्वारे १ हजार १५७ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
एलबीटी विभागाचे उत्पन्न कमालीचे घटत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कंपन्यांच्या भरणा रकमेत सरासरी १० टक्के वाढ झाली आहे. मंदीचा काळ जाऊन वाहन उद्योगाला तेजी आल्याने त्याचा अनुकूल परिणाम उद्योगधंद्यांवर जाणवला आहे.(प्रतिनिधी)