बारामतीच्या व्यावसायिकाला मागितली १० लाखांची खंडणी; कारला लावली खंडणी मागणारी चिठ्ठी
By विवेक भुसे | Published: August 3, 2023 04:03 PM2023-08-03T16:03:48+5:302023-08-03T16:04:05+5:30
तुला तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्कला जेवणाच्या डब्यात १० लाख रुपये आणून दे, अशी दिली धमकी
पुणे : बारामती येथील व्यावसायिक पुण्यात जेवायला आले असताना त्यांच्या कारला चिठ्ठी लावून १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. तुला तुझा व तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क येथे १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत बारामती येथील एका ३७ वर्षाच्या व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ ते १ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बारामतीत व्यवसाय असून सध्या ते पुण्यातील मगरपट्टा येथे राहतात. ते आपल्या मित्रांसह कोरेगाव पार्क येथील डेझर्ट वॉटर येथे जेवणाकरीता आले होते. त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन ते हॉटेलमध्ये गेले होते. जेवण करुन परत आल्यावर त्यांना दरवाजावर बंद पाकिट चिटकविलेले होते. त्यात फिर्यादी व त्यांचे कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यात दिलेल्या नंबरवर त्यांनी मित्राचा मोबाईलवरुन फोन केल्यावर तो कोणी उचलला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जेजुरी येथे असताना मित्राचे मोबाईलवर फोन आला. तुला, तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क या ठिकाणी जेवणाच्या डब्यात १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.