शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Published: February 15, 2024 04:52 PM2024-02-15T16:52:18+5:302024-02-15T16:52:42+5:30
मार्केट रिटर्न प्रमाणे परतावा देण्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता
पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने दोघांनी एका तरुणाला १० लाखांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी दोन भावांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत, चेतन शिंदे (३०, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल गोपीनाथ वाघ (३०) आणि प्रणय गोपीनाथ वाघ (२६, दोघे रा.सागर पार्क, वडगाव शेरी) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भावापैकी एकजण फिर्यादी चेतन यांचा मित्र आहे. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांची फ्लाय हाय नावाची ट्रेडिंग कंपनी असून, ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे काम करते. मार्केट रिटर्न प्रमाणे त्याचा परतावा देखील देते. असे सांगून दोघांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. जुलै २०२२ मध्ये सुरुवातीला फिर्यादीकडून आरोपींनी पाच लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. फिर्यादींनी त्यातील ४ लाख १० हजार रुपये रोख तर ८० हजार रुपये ऑनलाईन दिले. आरोपींनी काही प्रमाणात फिर्यादींना परतावा देखील दिला. दरम्यान २९ मार्च २०२३ या कालावधीत आरोपींनी डिमॅट खाते चालवून त्यामध्ये नफा तोटा ६० टक्के व ४० टक्के देण्याचे ठरवून आरोपींनी फिर्यादीसोबत वचन चिठ्ठी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना बनावट व खोटी कागदपत्रे दाखवून मुळ रकमेवरील परतावा न देता मुळ रक्कम दहा लाख आणि त्यावरील अतिरिक्त परतावा याचा अपहार व आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माने करत आहेत.