वृक्षलागवडीसाठी १० लाख पिंपळाची रोपं तयार, संवर्धन करणाऱ्यांना मोफत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:23+5:302021-07-11T04:09:23+5:30
पुणे : आपण ज्या जमिनीवर राहतो, त्याचे पहिले हक्कदार झाडं, पशुपक्षी आहेत. आपण त्यानंतर आलो आहोत. त्यामुळे जरी जमिनीचा ...
पुणे : आपण ज्या जमिनीवर राहतो, त्याचे पहिले हक्कदार झाडं, पशुपक्षी आहेत. आपण त्यानंतर आलो आहोत. त्यामुळे जरी जमिनीचा सात-बारा आपल्या नावावर असला, तरी त्याचे खरे मालक झाडं, पक्षी आहेत. गेली अनेक दशके या निसर्गाकडून आपण फक्त घेतले आहे. आता ते सर्व परत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशी झाडं लावणं आवश्यक आहे. त्यासाठी यंदा १० लाख पिंपळाची रोपे तयार केली आहेत. ती सर्वांना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती ‘ट्री मॅन’ रघुनाथ ढोले यांनी ‘लोकमत’ला दिली.
सध्या पावसाळा असल्याने वृक्षलागवडीला वेग आला आहे. झाडांचे महत्त्व आता सर्वांना समजू लागले आहे. नागरिकांनी फक्त देशीच झाडं लावावीत, यासाठी ढोले हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी दरवर्षी लाखो रोपे ते नागरिकांना देतात. पण ही राेपे जे खरंच संवर्धन करणार आहेत, त्यांनाच देतात. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी दिलेली लाखो रोपे मोठी झाली आहेत.
ढोले यांची देवराई नावाने नर्सरी असून, त्यामध्ये देशी झाडांची रोपे तयार केली जातात. राज्यभरातून दुर्मीळ असणाऱ्या झाडांच्या बिया ते जमा करतात. त्यानंतर रोपं तयार करतात आणि ते वृक्षलागवड करणाऱ्यांना मोफत दिली जातात. वृक्षलागवड कशी करावी, रोपं कशी तयार करतात आदी सर्व प्रशिक्षण ते स्वत: देतात. त्यामुळे त्यांनी दिलेली रोपे ९० टक्क्यांहून अधिक जगतात.
———————————-
दुर्मीळ बिया जमा करून तयार केली रोपे
राज्यभरातील जंगलांमध्ये फिरून आणि अनेक व्यक्तींकडून ढोले यांनी दुर्मीळ झाडांच्या बिया जमा केल्या आहेत. त्या बियांची रोपे तयार केली जातात. त्यानंतर ती रोपे जे खरंच झाडांचे संवर्धन करतील, अशा व्यक्तींनाच दिल्या जातात. रोप म्हणजे माझी मुलगी आहे आणि तिला तुम्ही प्रेमाने जपायचे आहे. असे सांगून ढोले सर्वांना रोपे देतात.
————————————
गेली चारशे वर्षे आपण निसर्गाकडून फक्त घेत आलो आहोत. आता भावी पिढीसाठी निसर्गाला जपायचे असून, वृक्षलागवड करून निसर्गाला परतफेड करावी लागणार आहे. आपण कुटुंबाचा जसा प्रपंच करत असतो, तसेच आता झाडांचा प्रपंच करायला हवा. झाडं प्रेमाने जपायला हवीत.
- रघुनाथ ढोले, वृक्षप्रेमी
———————————