Kasba By Elelction: कसबा पोटनिवडणुकीत १० लाख रुपये अन् १२ हजारांची २३१ लिटर दारू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:34 AM2023-02-23T09:34:09+5:302023-02-23T09:34:18+5:30
कसबा मतदारसंघात ९ तपासणी नाके, ९ भरारी पथकांची नियुक्ती केली असून संपूर्ण मतदारसंघाची वाहनांची तपासणी करण्यात येत आहे
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. भरारी पथक आणि नाका तपासणीत आतापर्यंत १० लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती कसबा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
या मतदारसंघात ९ तपासणी नाके, ९ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १० हजार ६६८ वाहनांची तपासणी केली आहे. संपूर्ण प्रचार यंत्रणेचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येत आहे. १२ हजार २५० रुपये किमतीची २३१ लिटर दारूही जप्त केली आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्हीकडे भाजप आणि महविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दोन्ही पक्षाचे नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारातही सहभागी होत आहेत. राज्याचे मुखमंत्री , उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने कसबा - चिंचवड मतदार संघात भेटी दिल्या आहेत. तसेच त्या भागातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या आहेत.
कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आगामी महापालिकेच्या निवडणुकांचं भविष्य ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे, या विधानसभेत गेली ३० वर्षे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने कसब्यातील सीट मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. तर महविकास आघाडीसुद्धा जोरदार प्रचार करू लागली आहे. परंतु येथील नागरिकांचा कौल कोणाकडे आहे. हे पुढील आठवडयात कळणार आहे.