Pune: प्रवेशासाठी 10 लाखांची लाच; पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन रंगेहात जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 08:17 PM2023-08-08T20:17:33+5:302023-08-08T20:18:05+5:30
दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले...
- किरण शिंदे
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले. आज सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 49 वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.
दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.