Pune: पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: January 13, 2024 04:00 PM2024-01-13T16:00:21+5:302024-01-13T16:00:45+5:30
याप्रकरणी कोथरूड आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला आहे...
पुणे : पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोघांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या घटनेमध्ये, कोथरूड परिसरात राहणाऱ्या संतोष श्रीराम जोशी यांनी फिर्याद दिली आहे. २६ ऑगस्ट २०२३ रोजी पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील असा मेसेज आला. गुगल मॅपवर काही रेस्टोरंटला रिव्ह्यू दिल्यावर १५० रुपये मिळतील असे सांगितले. त्यानंतर सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना एकूण ५ लाख ४२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने कोथरूड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या रोहित दारवटकर यांनी फिर्याद दिली आहे. १४ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. टास्क देऊन ते पूर्ण करून घेऊन सुरुवातीला थोडे पैसे देऊन विश्वासात घेतले. त्यानंतर गुंतवणूक कण्र्यास भाग पाडून ५ लाख १० हजार रुपये उकळले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.