दहावी, बारावी शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी १० हजार ८४१ अर्ज
By राजू हिंगे | Published: January 7, 2024 02:37 PM2024-01-07T14:37:15+5:302024-01-07T14:37:49+5:30
अर्जाची तपासणी करण्यास सुरवात झाली असुन येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील
पुणे: पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी १० हजार ८४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची तपासणी करण्यास सुरवात झाली असुन येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
पुणे महापालिकेने या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. अर्ज करण्याचा कालावधी २९ डिसेंबर रोजी संपला आहे या कालावधीत पालिकेकडे १०,८४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच अर्ज हा सेव्ह ॲज डाफ्र्ट मध्ये ठेवत होते. त्यामुळे महापालिका समाज विकास विभागाने सूचना केली होती कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा सेव्ह ॲज ड्राफ्ट मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज भरावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील. तरीही २हजार ६६९ अर्ज रद्द झाले आहेत. यात संबंधित अर्जदाराचीच चूक आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्थसंकल्पात 21 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर तात्काळ तपासण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर तात्काळ विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. महिना अखेर पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचे पैसे दिले जातील. लोकसभा आचारसंहिता लागू होण्या अगोदर ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहे असे पालिका प्रशासनाने सांगितले.