अवयवदानाच्या जनजागृतीसाठी त्या अवलियाचा १० हजार किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:46 AM2019-01-26T01:46:34+5:302019-01-26T01:46:40+5:30
या शब्दांत साद घालत त्या अवलियाने देशात १० हजार किलोमीटर अंतर दुचाकीवरून प्रवास करीत अवयवदानाचा जागर सुरू केला आहे.
बारामती :
‘गाँव-गाँव शहर-शहर में
यही मेरा नारा है,
अवयवदान करना, करवाना
काम तुम्हारा हमारा है
हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई
अवयवदान कीजिए मेरे भाई’
या शब्दांत साद घालत त्या अवलियाने देशात १० हजार किलोमीटर अंतर दुचाकीवरून प्रवास करीत अवयवदानाचा जागर सुरू केला आहे. ९९ दिवसांचा प्रवास करून परिक्रमा पूर्ण करणाऱ्या या अवलियाचे बारामतीकरांनी जोरदार स्वागत केले. १८ राज्यांत दहा हजार किलोमीटर अंतर पूर्ण केलेल्या या ज्येष्ठ नागरिकाचे बारामतीत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांचा अवयवदान जागृतीचा जागर यावेळी कौतुकाचा विषय ठरला.
प्रमोद लक्ष्मण महाजन (रा. ढवळी, ता. बारामती, जि. पुणे) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. बारामती शहरात शुक्रवारी भाग्यजय चॅरिटेबल ट्रस्टच्या आणि भाग्यजय हॉस्पिटलच्यावतीने डॉ. आर. डी. वाबळे, डॉ. स्वाती वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. ४९ व्या वर्षी लष्करात सैनिक म्हणून काम करणाºया मित्राच्या भावाला त्यांनी किडनी दान केली आहे. त्यामुळे ‘मी केले, तुम्ही करा’ असा संदेश देण्यासाठी महाजन यांनी २१ आॅक्टोबरला पुणे शहरातून शनिवारवाड्यापासून भारत परिक्रमेस सुरुवात केली. झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यासह १८ राज्यांतील प्रवास महाजन यांनी शुक्रवारी (दि. २५) पूर्ण केला.
या मोहिमेबाबत महाजन म्हणाले, ‘‘आजच्या काळात अवयवदान महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहन केल्यास त्याची राख होते, दफन केल्यास माती होते. त्यापेक्षा अवयवदान केल्यास दुसºयांना जीवन मिळते. यासाठी जागृतीची गरज आहे. जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिक्रमेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला.’’ त्यामध्ये अवयवदानाबाबत असणाºया अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे महाजन म्हणाले. मुलींचे लग्न, मुलाच्या शिक्षणासाठी गावची शेती विकली. तेव्हापासून सामाजिक कामात आहे. अवयवदान जागृतीबाबत देशात तेलंगणा, तमिळनाडू पुढे आहेत, तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेसाठी रीबर्थ, किडनी, मोहन, लाईफ डोनेट आदी फाउंडेशननी मदत केली. तसेच, किंग बायकर्स ग्रुपचे सहकार्य लाभल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
डॉ. वाबळे यांनी ट्रस्टच्या वतीने पाच हजार रुपयांचा धनादेश महाजन यांना जनजागृतीच्या मदतीसाठी दिला. या वेळी डॉ. आर. डी. वाबळे यांनी अवयवदान जागृतीची गरज आहे. खेड्यात याबाबत असणारे गैरसमज, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, डॉ. स्वाती वाबळे यांनी रुग्णालयात अवयवदानासाठी अर्ज उपलब्ध करण्याची गरज व्यक्त केली. या वेळी डॉ. श्रद्धा वाबळे, डॉ. मिलिंद ठोंबरे, डॉ. गणेश पन्हाळे, डॉ. माऊली कांबळे, डॉ. मनीष माळी, डॉ. प्रियांका निंबाळकर, योगेश तावरे, शंकर सावंत आदी उपस्थित होते.
>उसने पैसे घेऊन किडनी द्यायला गेले
भावाच्या दोन्ही किडन्या ‘फेल’ झाल्या आहेत. त्याचा रक्त गट ‘ओ पॉझिटिव्ह’ असल्याने आमच्या कुटुंबातील कोणाचीच किडनी त्याला ‘मॅच’ होत नसल्याचे माझ्या मित्राने सांगितले. यावर मी त्याला लगेचच किडनी द्यायची तयारी दाखविली. यावर खुळ्यासारखा तो माझ्याकडे पाहतच बसला. ‘अरे किडनी द्यायची आहे, किडनी!’ असे मलाच तीन-चार वेळा त्याने सांगितले. ‘मला चांगले माहीत आहे, मी काय करतोय. एक किडनी असलेली माणसं जगतातच ना? माझी तयारी असल्याचे त्याला मी सांगितले. मात्र, मुंबईला जाताना मला प्रवासखर्च देण्यास तो विसरला. त्यावेळी आम्ही पती-पत्नी दुसºयाच्या शेतात मजुरी करीत होतो. मला ११ रुपये, तर माझ्या पत्नीला १० रुपये पगार होता. मी गावातील राजाराम पवार या शिक्षकाकडून ३५० रुपये घेऊन मुंबईला किडनी देण्यास गेलो.’
एखादा व्यक्ती ‘ब्रेनडेड’ घोषित झाल्यानंतर त्याचे अवयवदान केले जातात. मात्र, अवयवदानाबाबत आजही अनेक अंधश्रध्दा आहेत. डोळे काढल्यानंतर वर गेल्यावर देव विचारेल, मी तर तुला दोन डोळे दिले होते. मग तु फक्त खोबण्याच घेउन कसा वर आला,अशी देखील अंधश्रध्दा आहे. वास्तविक डोळ्याचा काळा भाग कॉर्निया काढुन घेतला जातो. अंत्यविधीनंतर मृतदेहाची राख, माती होते. मग देवच काय कोणालाच काही समजण्याचा प्रश्नच येतो कुठे, असा सवाल प्रमोद महाजन यांनी केला.
वाळवा येथील ६७ वर्षीय प्रमोद महाजन यांनी अवयवदानाचा जागर करण्यासाठी १० हजार किमी प्रवास पूर्ण केल्यानंतर बारामतीत त्यांचे डॉ. आर. डी. वाबळे यांनी स्वागत केले.