शहरात तब्बल दहा हजार डासोत्पत्ती स्थाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:28 AM2017-07-21T04:28:20+5:302017-07-21T04:28:20+5:30
महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातर्फे शहरातील खासगी आणि सार्वजनिक स्थळांमधील डेंगीची १०,००० डासोत्पत्ती स्थाने शोधून काढण्यात आली
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातर्फे शहरातील खासगी आणि सार्वजनिक स्थळांमधील डेंगीची १०,००० डासोत्पत्ती स्थाने शोधून काढण्यात आली आहेत. सोसायट्यांच्या निष्काळजीपणामुळे डासोत्पत्ती स्थाने निर्माण झाल्याने तब्बल ६०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ३७०९ जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
पावसाच्या दिवसांमध्ये डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. साठलेले पाणी, घरात साठवण्यात आलेले पाणी आदी ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातर्फे १९ जूनपासून शहरातील विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांची पाहणी करण्यात आली. यामध्ये एका महिन्यात १,७४,५१९ खासगी तर ४९,७९३ सार्वजनिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सोसायटी आणि घरातील पाण्याच्या टाक्या आणि इमारतींच्या आजूबाजूला पडलेले भंगार सामान, घरातील ड्रममध्ये साठवून ठेवलेले पाणी आदी ठिकाणे डेंगीच्या डासांचे प्रमुख अधिवास ठरत आहेत. डासोत्पत्ती स्थानांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. आतापर्यंत शहरातील विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डेंगीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे,
अशी डॉ. कल्पना बळीवंत यांनी’ लोकमत’शी बोलताना दिली.
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार पाण्याच्या टाक्या आणि टायर,
पाणी ठिबकणारे फ्रिज, एअर
कुलर, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर भंगार सामान यात डासांची
पैदास सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे.
भंगार आणि पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच तळघरे, पाणी वाहून जाण्याची चेंबर, सेप्टिक टँक, कमळाची कुंडे, जलतरण तलाव, लिफ्टचे गाळे (डक्ट), हौद आणि खड्ड्यांमध्येही पाणी साठून डासांसाठी पोषक ठिकाणे तयार झाली आहेत.
डेंगीसारख्या विषाणूजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. डेंगीच्या डासांची पैदास कशी टाळाल, रुग्णांची काळजी कशी घ्याल आदींबाबत माहिती देण्यासाठी पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला की धूरफवारणीची मागणी करण्यात येते. मात्र, सध्याच्या वातावरणात डेंगीचा रुग्ण आढळल्यास दारे, खिडक्या बंद करून फवारणी केली जाते. खुल्या वातावरणात धूरफवारणीचा उपयोग होत नाही.- डॉ. कल्पना बळीवंत, प्रमुख, कीटक प्रतिबंधक विभाग