एक एकरात १० टन केळीचे उत्पादन
By admin | Published: July 25, 2016 02:09 AM2016-07-25T02:09:01+5:302016-07-25T02:09:01+5:30
कोळमाथा येथील ३० वर्षीय युवकाने स्वत:चा व्यवसाय सांभाळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एक एकर क्षेत्रात ग्रँड नैन टिश्यूकल्चरवर १० टन केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आ
रामनाथ मेहेर, ओतूर
ओतूरपासून जवळच असलेल्या कोळमाथा येथील ३० वर्षीय युवकाने स्वत:चा व्यवसाय सांभाळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एक एकर क्षेत्रात ग्रँड नैन टिश्यूकल्चरवर १० टन केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या केळीपासून आजचा बाजारभाव स्थिर राहिल्यास ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
या युवकाचे नाव नितीन भास्कर डुंबरे आहे. त्याने बायोटेक्नॉलॉजी व डी फार्मसी या पदविका प्राप्त केल्या आहेत. परंतु, स्वत:चा डी फार्मसीचा व्यवसाय सांभाळून शेतीसंबंधी आधुनिक माहिती तंत्रज्ञान मिळवून उत्तम प्रकारे शेतीतून विविध प्रकारचे उपक्रम राबवून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
गेल्या वर्षी १० जून २०१५ रोजी उती संवर्धित (टिशू कल्चर) ग्रँड नैन या जातीच्या केळीची लागवड केली. या प्रयोगाविषयी माहिती देताना नितीन भास्कर डुंबरे म्हणाले की, लागवडीसाठी ६ फुटांवर सरी पाडून ६़६ अंतरावर केळी रोपांची लागवड केली. रोपांसाठी बेड तयार केले. लागवडीपूर्वी एकरी प्रमाणात ४ ट्रॉली शेणखत टाकले, रोपांच्या मुळाशी बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांचे ड्रेचिंग करून लागवड केली, त्याच वेळी युरिया १ गोणे व सुपर फॉस्पेट २ गोणींचा डोसही दिला. रोपाची वाढ समाधानकारक झाली. त्यानंतर दर दोन महिन्यांनी युरिया व पोटॅश या खतांची मात्रा नियमित दिली. याच वेळी सह्याद्री बायोग्रीन सातारा यांच्या जैविक खतांचा वापरही एकरी प्रमाणात केला.
यासाठी केळी उत्पादक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुविलास गाढवे, नितीनचे वडील भास्कर पोपट डुंबरे यांनी वेळोवेळी केळी बागेस भेट देऊन नितीन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.