पुण्यात १० टक्के पाणीकपात
By admin | Published: August 27, 2015 04:53 AM2015-08-27T04:53:41+5:302015-08-27T04:53:41+5:30
शहराला एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, एक सप्टेंबरपासून ही कपात लागू करण्यात येणार असून, या बाबतचा
पुणे : शहराला एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, एक सप्टेंबरपासून ही कपात लागू करण्यात येणार असून, या बाबतचा प्रस्ताव पक्षनेत्यांपुढे येत्या काही दिवसांत ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गेल्या अडीच महिन्यांत पावसाने दडी मारल्याने, तसेच परतीचा पाऊसही कमी होण्याची शक्यता असल्याने धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा शहराला पुढील वर्षभर पुरावा यासाठी १० टक्के पाणीकपात अपरिहार्य असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणात जेमतेम ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराला २ वेळेस पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खडकवासला धरणातून दरदिवशी १२५० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी घेतले जाते. त्यानुसार, शहरातील काही भागांत दोन वेळेस पाणीपुरवठा केला जातो. तर काही भागात एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. १० टक्के पाणी कपातीनंतर प्रशासनातर्फे शहरासाठी दर दिवशी ११०० एमएलडी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे धरणसाठ्यातील मिळणारे पाणी मेअखेरपर्यंत पुरेल, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र, हे पाणी पुढील वर्षी म्हणजेच सप्टेंबरअखेरपर्यंत पुरवायचे असल्याने दिवसाआड कपात करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या कामांसाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा, अशी विनंती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बांधकाम व्यावसायिकांना केली आहे. त्यासाठी क्रेडाई, तसेच मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेस महापौरांकडून पत्र देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या बचतीसाठी संघटनेनेच पुढाकार घेऊन सदस्यांना याबाबत सूचना कराव्यात, असेही महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.