भोरमध्ये केंजळ गडावरून पाय घसरत १० वर्षीय मुलगा दरीत, ग्रामस्थांच्या मदतीने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:46 PM2021-06-13T12:46:42+5:302021-06-13T12:46:49+5:30
आज पहाटेच्या सुमारास एका गृपबरोबर ट्रेकिंगसाठी गेला होता
पुणे: भोर तालुक्याजवळील केंजळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून दरीत पडल्याची घटना घडली आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून दरीत उतरत मुलाचे प्राण वाचवले आहेत. मयंक गणेश उर्णे (रा. सासवड ) असे त्या मुलाचे नाव आहे.
सासवडचा एक ग्रुप गडावर ट्रेकिंगसाठी पहाटे सुमारास गेले होते. किल्ल्यावर ८.३० वाजता ते पोहोचले. दाट धुके पसरल्याने सर्वत्र अंधुक दिसू लागले होते. त्यावेळी ग्रुप मधील मयंक हा पाय घसरून खाली दरीत कोसळला. नंतर ग्रुपमधल्या सदस्यांनी स्थानिक गावकरी आणि पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. केंजळ गडाचा पायथ्याला असणाऱ्या ओहळी गावातील पाकेरेवाडी येथील ग्रामस्थ आणि युवक मदतीला धावले. हे युवक पायवाटेने झाडांचा आधार घेत छोट्या मुलाजवळ पोहोचले.
तो बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत होता. त्याच्या हाता पायांना जखम झाली होती. सदर युवकांनी त्याला हातात घेऊन व्यवस्थितपणे गडावरच्या पायथ्याशी आणले. या ठिकाणी वाई सातारा पोलीस हजर होते. अपघातातील लहान युवकाला वाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले. मुलाला सुखरुप आणून जीव वाचवल्याबद्दल पाखरे वस्तीतील ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.