Pune Heavy Rain: सिंहगड रोड परिसरात बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:37 PM2024-07-25T15:37:29+5:302024-07-25T15:38:15+5:30
पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याने खबरदारीसाठी जवान तैनात
पुणे : पुण्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. संपूर्ण शहरात पावसाने धुमाकूळ घातलाय. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याचे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करी जवान सिंहगड रोड भागात दाखल झाले आहेत.
आज पहाटे सुद्धा याच प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लोकांचे संसार रस्त्यावर आले होते. अनेक भागात तर नागरिक अडकले होते. प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्यात आली. आता पुन्हा सायंकाळी अशी पुरासारखी स्थिती निर्मण होऊ नये यासाठी २४ मराठा बटालियन औंध चे 100 जवान सिंहगड रोडला दाखल झाले आहेत.
एकतानगरी, निंबजनगरी तसेच आनंदनगर भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यात रुग्णांचीही विशेष काळजी घेऊन त्यांना बाहेर काढले जात आहे. अशा परिस्थितीत काही नागरिक घरातून बाहेर येण्यास तयार नाही. आता ४ वाजता पुन्हा खडकवासला इथून विसर्ग होणार आहे. त्या अनुषंगाने नियोजनास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्करी जवानांना मदतीसाठी सूचना केली होती. त्यानुसार आता सिंहगड रोड परिसरात जवान दाखल झाले आहेत.
भारतीय सशस्त्र दले पूर्ण तयारीत सुसज्ज
लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील, असे भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडतर्फे सांगण्यात आले आहे. दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले पूर्ण तयारीत आणि सुसज्ज असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.