गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 02:26 PM2024-01-30T14:26:04+5:302024-01-30T14:26:32+5:30
ईडीच्या चौकशीप्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पवार यांच्याकडून हा दावा दाखल करण्यात आल्याचे समजते....
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. ईडीच्या चौकशीप्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पवार यांच्याकडून हा दावा दाखल करण्यात आल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून रोहित पवार यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप केला होता. तसेच ‘गल्ला मारला असेल तर चौकशीला सामोरे जावेच लागेल’ असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यावर चुकीचे किंवा खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी (दि. २९) रोहित पवार यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.