‘त्या’ निष्क्रिय बँक खात्यात तब्बल १०० कोटी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:12 AM2021-03-19T04:12:03+5:302021-03-19T04:12:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बँकेतील निष्क्रिय (डोरमंट) खात्यांचा गोपनीय डेटा मिळवून त्यांची विक्री करुन त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बँकेतील निष्क्रिय (डोरमंट) खात्यांचा गोपनीय डेटा मिळवून त्यांची विक्री करुन त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या या कटाचे आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या पाच खात्यांपैकी एका निष्क्रिय खात्यात तब्बल १०० कोटी रुपये २०१९ पासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य बाकी चार खाती ही कॉर्पोरेट असून त्यात सध्या व्यवहार होत आहेत.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनघा अनिल मोडक, तसेच राजेश शर्मा, परमजित संधू (दोघे रा. औरंगाबाद) या तिघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्या सर्वांची २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकांनी औरंगाबाद, लातूर, वापी, हैदराबाद तसेच पुण्यात अशा विविध ठिकाणी आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन राबविले. त्याचबरोबर हैदराबाद आणि वापी येथील संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, अनघा मोडकने या गुन्ह्यातील सर्व आरोपींना एकत्र बोलावले असल्याचे आरोपींकडे केलेल्या तपासात माहिती मिळाली. अनघा मोडक ही डेटा विक्रीसाठी मिळविणे व संबधितांपर्यंत पोहोचविणे, असे दलालीचे काम करीत असल्याने तिला सर्वांची माहिती आहे. त्यासाठी तिची पोलीस कोठडी आवश्यक आहे.
राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांनी मिळून डेटा विकत घेण्याकरिता कोणाकडून पैसे घेतले. तसेच त्यांना मिळणारा डेटा ते कोणाला पुढे सुपूर्त करणार होते, याबाबतचा तपास करायचा आहे. ‘डॉरमंट’ खात्याचा गोपनीय डेटा आरोपींना कोणी दिला आहे किंवा हा डेटा आरोपींनी कसा मिळविला याचा शोध घेणे आवश्यक आहे. सर्व आरोपींकडे एकत्रित तसेच स्वतंत्रपणे तपास करायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने या तिघांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
याबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आरोपींकडे ज्या बँकेच्या खात्यांची माहिती मिळाली आहे, त्या बँकांकडे आम्ही चौकशी करीत असून खातेदारांचे जबाब नोंदविण्यात येत आहे. यातील आणखी काही संशयित आरोपी असून त्यांच्या शोधासाठी परराज्यात पथके रवाना झाली आहे. हे आरोपी मिळाल्यानंतर हा नेमका प्रकार ते कसा करणार होते. बँकेतील खात्यांमधील रक्कम कशा प्रकारे काढून घेण्यात येणार होते, याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.
चौकट
अनघा मोडक ही सब शेअर ब्रोकर
अनघा मोडक ही एका शेअर ब्रोकरची सब शेअर ब्रोकर म्हणून गेली काही वर्षे काम पाहत होती. तिने अनेकांची रक्कम विविध शेअरमध्ये गुंतविली होती. २०१९ मध्ये सेबीने मिनिमम मॉर्जिन बेसचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक शेअर ब्रोकरवर कारवाई करुन त्यांचे डी-मॅट अकाऊंट बंद केले होते. ती ज्यांचे सबब्रोकर म्हणून काम पाहत होती, त्यांचे अकाऊंट बंद झाल्याने त्याचा तिला फटका बसला होता. तिला वेगवेगळ्या लोकांची १२ कोटींची देणी असल्याचे ती पोलिसांना सांगत आहे. या शेअर व्यवसायातूनच तिची रोहन मंकणीशी ओळख झाली होती. हा डेटा विक्री करुन त्यातून अडीच कोटी रुपये मिळविण्याचा अनघा मोडक हिचा प्रयत्न होता. सुधीर भटेवरा याच्याकडे सध्या चौकशी सुरु असून, तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे नवटके यांनी सांगितले.