निवडणुकीसाठी १०० कोटींचा झटका
By admin | Published: December 28, 2016 04:32 AM2016-12-28T04:32:51+5:302016-12-28T04:32:51+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत तब्बल शंभर कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत तब्बल शंभर कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थायी समितीने मंगळवारी शंभर कोटींचा धमाका केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
सभापती डब्बू आसवानी हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू
शकते. त्यामुळे मोठ्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी सभेपुढे मांडले
जावेत, यासाठी समितीचा आटापिटा सुरू होता. अशा परिस्थितीत मंगळवारी स्थायी समितीची
सभा झाली. या सभेत १००
कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये विषयपत्रिकेवरील ६५ कोटी रुपये खर्चाचे, तर ऐनवेळचे ३५ कोटी रुपये खर्चाचे विषय होते.
स्थायीची सभा दुपारी अडीच वाजता बोलावण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सहा वाजले, तरी सभा सुरू झाली नाही. अखेर सायंकाळी साडेसहा वाजता सभा सुरू झाली. त्यामध्ये १०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
शहरातील विविध ठिकाणाच्या कंपनी तसेच महापालिका यांनी खोदलेल्या रस्त्यांचे चर बुजविण्यासाठी येणाऱ्या ६
कोटी ८३ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच सांगवी-किवळे रस्त्यावरील डांबरीकरण व पदपथासाठी २ कोटी १ लाखाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)
- महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत इयत्ता ५वी ते ७वीमधील ८२४ पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे १६ लाख ४८ हजार रुपये, तसेच ८वी ते १०वीमधील ११५९ पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयेप्रमाणे ३४ लाख ७७ हजार रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.