Pune: मॉडेल, फॅशन डिझायनरचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याच्या आमिषाने 100 जणांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:34 PM2023-05-17T12:34:19+5:302023-05-17T12:35:02+5:30
कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
- किरण शिंदे
पुणे : फेसबुक इंस्टाग्रामद्वारे जाहिरात करून मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर याचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याचे आमिष दाखवत जवळपास 100 जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. मार्च 2022 ते मे 2023 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा, जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे आणि अनिरुद्ध बिपिन रासने अशी पुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पल्लवी प्रशांत सुगंधव (वय 33) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात आतापर्यंत 23 जणांनी अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्यास संदर्भात तक्रार दिली आहे. आरोपींकडून अशाप्रकारे जवळपास 100 जणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी क्लिक ऍंड ब्रश या नावाने कंपनी स्थापन केली. कोथरूडच्या भुसारी कॉलनी या कंपनीचे कार्यालय होते. आरोपींनी फेसबुक आणि सोशल मीडिया द्वारे जाहिरात केली. मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर याचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याचे आमिष त्यांनी दाखवले.
यासाठी त्यांनी अंदाजे 100 जणांना तीन महिने आणि दोन वर्षाचे सबस्क्रीप्शन घेण्यास भाग पाडले. सबस्क्रीप्शनचे पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कंपनी अडचणीत असून काम बंद केल्याचे सांगून फसवणूक केली. आतापर्यंत आरोपींनी एकूण 43 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.