फळभाज्या किलोला शंभरी पार; पालेभाज्याही भलत्याच महाग, नेमकं कारण काय?
By अजित घस्ते | Updated: June 18, 2024 20:33 IST2024-06-18T20:33:39+5:302024-06-18T20:33:54+5:30
मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी वाढ

फळभाज्या किलोला शंभरी पार; पालेभाज्याही भलत्याच महाग, नेमकं कारण काय?
पुणे : कडक ऊन, पूर्वमोसमी पाऊल लांबल्याने फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी होत आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात गेल्या आठवडाभरापासून फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे बहुतांश फळभाज्यांच्या दरात तेजी असल्याचे ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. तर नवीन लागवडीस किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे शेतकरी दिनकर भोंडे यांनी सांगितले.
फळभाज्यांचे एक किलोचे दर
टोमॅटो- ७० ते ८० रुपये
भेंडी - १२० ते १४० रुपये
गवार - १५० ते १६०
वांगी - ८० ते १००
फ्लाॅवर - १०० ते १२०
कोबी - ७० ते ८०
जुडी :
मेथी - ४० ते ५०
कोथिंबीर - ५० ते ६०
कडक ऊन, तसेच पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. नवीन लागवड पावसावर अवलंबून आहे. मुसळधार पाऊस झाल्यास लागवड, तसेच प्रतवारीवर परिणाम होतो. मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. - प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते, किरकाेळ बाजार
गेल्या पंधरा दिवसांपासून पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे. मेथीच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बहुतांश पालेभाज्यांचे दर तेजीत असून, महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार आहेत. - राजेंद्र सूर्यवंशी व्यापारी