गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 03:08 PM2023-08-22T15:08:05+5:302023-08-22T15:08:33+5:30

१ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा

100 Rs. More than 8 lakh families in the district will benefit | गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा

गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा

googlenewsNext

पुणे : गेल्या वर्षीची दिवाळी तसेच यंदाचा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळालेला आनंदाचा शिधा आता पुन्हा गणेशोत्सव व दिवाळीलाही देण्यात येणार आहे. याचा लाभ शहरातील ३ लाख ३३ हजार व जिल्ह्यातील ५ लाख ७४ हजार शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. राज्य सरकारतर्फे दिवाळीतही आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. त्यावेळी अशाच पद्धतीने शिधावाटप करण्यात आले होते. त्यानंतर यंदा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याच्या निर्णयाचा जिल्ह्यातील सुमारे आठ लाख ९० हजार शिधापत्रिकाधारकांना झाला होता.

हा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक या प्रमाणे दिला जाणार आहे. १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गणेशोत्सव व दिवाळीसाठीही वाटण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील ३ लाख २९ हजार ९०७ प्राधान्य कुटुंब लाभार्थी असून अंत्योदय योजनेतील ७ हजार ३७० लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पुणे शहराचे अन्नधान्य पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी यासाठी एकूण ३ लाख ३७ हजार २७७ किटची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ते म्हणाले, “गेल्या वेळेस अर्थात पाडव्याला शहरात ३ लाख १७ हजार ८८१ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले होते. आता यात थोडी वाढ झाली आहे. शिधावाटपाचे प्रमाण गेल्या वेळेस १०० टक्के होते.”

जिल्ह्यातही या वेळेस ५ लाख ४० हजार ७४४ प्राधान्य कुटुंब लाभार्थी व ४८ हजार ५७० अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानुसार एकूण शिधापत्रिकांची संख्या ५ वाख ८९ हजार ३१४ इतकी होते. मात्र, गणेशोत्सवासाठी ५ लाख ७४ हजार ५९ किटची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. पाडव्याला वाटप झालेल्या शिधा किटच्या संख्येनुसार ही मागणी राज्य सरकारकडे नोंदविण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी सांगितले. आनंदाचा शिधा वाटप हा ई-पॉसद्वारे दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. जिल्ह्यात गेल्या वेळी एकूण ५ लाख ६० हजार ६१९ जणांना याचा लाभ मिळाला होता.

''या वस्तू एकत्र व वेळेवर यायला हव्यात. अन्यथा ग्राहकांमध्ये व दुकानदारांमध्ये रोष वाढतो. पूर्वीच्या मागणीनुसार या कीट उधारीवर देण्यात याव्यात. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर'' 

Web Title: 100 Rs. More than 8 lakh families in the district will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.