Corona Vaccination Pune: १०० लसी आणि ५०० नागरीक! लसीकरण केंद्रांवर गोंधळच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:00 PM2021-05-05T18:00:22+5:302021-05-05T20:02:53+5:30
लसीकरण केंद्राचं ठरू नयेत प्रसाराची केंद्र नागरिकांनी व्यक्त केली भीती....
पुणे: तब्बल चार दिवसानंतर लसीकरण सुरू झाल्याने पुण्यामध्ये लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडालेला बघायला मिळाला. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर गर्दी झाल्याने लसीकरण मोहीम हीच सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरतील का काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे शहरात आज चार दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र लसीकरण राहिलेले लोक आणि नोंदणी झालेले नागरिक या सगळ्यांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती. त्यातच एकूण १८ केंद्र सुरळीत सुरू राहणार असल्यामुळे कमी केंद्रांवर जास्त नागरिक पाहायला मिळाले. अनेक तास थांबून देखील अनेकांना लस न घेता परतावं लागलं.त्यातच एकाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र , १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी ४५ चा वरचा नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याने हे केंद्र आणि लसीकरण मोहीमच सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरणार नाहीत ना अशी भीती नागरिक व्यक्त करत होते. त्यातच केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने रांगेतल्या नागरिकांना आणखीनच रखडावे लागले.
लोकमतशी बोलताना लसीकरणासाठी आलेले एक नागरीक म्हणाले" कोरोनापासून वाचायचे तर लसीकरण आवश्यक आहे.मात्र अडीच तास रांगेत थांबून देखील लसीकरण झालेलं नाही. गर्दी इतकी की यातच कोरोना होतोय का याची भीती वाटते आहे "