१00 स्त्रिया, १00 मिनिटे आणि १०० टक्के; ‘स्टेटस : बाईमाणूस’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:51 AM2020-03-04T11:51:36+5:302020-03-04T11:54:05+5:30
स्त्रीभ्रूणहत्या, महिला असुरक्षितता, कास्टिंग काऊच अशा विविध विषयांचे प्रतिबिंब या प्रयोगामध्ये उमटणार
पुणे : रंगभूमी म्हणजे प्रायोगिक कलाविष्काराचे व्यासपीठ. आजवर रंगमंचावर ‘न भूतो न भविष्यती’ असे अनेक प्रयोग सादर झाले आहेत. आता पुन्हा एका नव्या ‘प्रयोगासाठी रंगमंच सज्ज झाला आहे. ‘१०० स्त्रिया, १०० मिनिटे आणि १०० टक्के सत्य सांगणारा एक आगळावेगळा अविष्कार आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त रसिकांसमोर सादर होणार आहे. जुन्या काळातील महिलांनी केलेल्या संघर्षापासून स्त्रीभ्रूणहत्या, महिला असुरक्षितता, कास्टिंग काऊच अशा विविध विषयांचे प्रतिबिंब या प्रयोगामध्ये उमटणार आहे. या प्रयोगाचे नाव आहे ‘स्टेटस : बाईमाणूस’!
येत्या ७ मार्च रोजी भरत नाट्यमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता हा रंगाविष्कार अनुभवता येणार आहे. ही एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन विनिता पिंपळखरे रसिकांसमोर येत आहेत. लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी पार पडत तब्बल १०० महिलांना रंगमंचावर आणण्याचे शिवधनुष्य पिंपळखरे यांनी पेलले आहे. या संकल्पनेविषयी विनिता पिंपळखरे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.
त्या म्हणाल्या, स्त्रीकडे नेहमी ‘बाई’ म्हणूनच पाहिले जाते. ‘माणूस’ म्हणून तिची दखलच घेतली जात नाही. या प्रयोगामध्ये वेगवेगळी स्क्रिप्टस तयार केली आहेत. प्रसिद्ध कवी उदा: ‘बालकवी’ (केशव त्रिंबक ठोंबरे) ज्यांनी ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ सारखी निसर्ग कविता लिहिली. पण पत्नी पार्वती ठोंबरे यांना बोराच्या झाडीच्या काट्याने ते मारायचे. डॉ. विश्राम घोले या समाजसुधारकाच्या काशीबाई मुलीला शिक्षणासाठी बाहेर पडल्यामुळे समाजातील काही व्यक्तींनी मारून टाकले, रमाबाई रानडे यांनादेखील संघर्ष करावा लागला. या माध्यमातून जुन्या काळातील महिलांचा आयुष्यपट मांडला आहे. तर दुसरीकडे काही सत्यघटनेवर आधारित कहाण्या महिला सांगत आहेत. जुन्या काळापासून आधुनिक युगापर्यंतच्या महिलांनी केलेल्या संघर्षाची गाथा उलगडली जाणार आहे. १०० टक्के सत्य, १०० मिनिटे, १०० महिलांच्या माध्यमातून मांडत आहे. प्रयोगात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवले आहे. ही संकल्पना अनेकांना आवडली. या प्रयोगातून काही टोचणारे निष्कर्षही काढले आहेत.
...........
बाईकडे माणूस म्हणून पाहणे गरजेचे
एकही महिला धर्म संस्थापक नाही, पण तिच्यावर जाती-धर्माची बंधने घातली जातात. महिला पुढे येऊन एकेक वाक्यात हे निष्कर्ष सांगणार आहेत. हा प्रयोग समाजमनाला नक्कीच विचार करायला लावणारा असून, यामुळे एका ‘बाई’कडे ‘माणूस’ म्हणून बघण्याचा प्रवास सुरू होईल, अशी आशा करायला हरकत नाही.