रविवार पेठेतील १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:02 PM2019-06-06T14:02:52+5:302019-06-06T14:05:32+5:30
रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळील सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कोसळली़ सुदैवाने हा वाडा रिकामा असल्याने कोणीही जखमी झालेले नाही.
पुणे : रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळील सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कोसळली़ सुदैवाने हा वाडा रिकामा असल्याने कोणीही जखमी झालेले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठ पोलीस चौकीच्या पाठीमागील बाजूला ७३२ रविवार पेठ या ठिकाणी संजय पासलकर यांच्या मालकीचा सुमारे १०० वर्ष जुना वाडा आहे़ हा वाडा धोकादायक झाला असल्याने सध्या त्या ठिकाणी कोणी रहात नाही. या वाड्यासमोरील बाजूला रस्त्याचे काम सुरु आहे़ आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वाड्याच्या समोरील बाजूची एक भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याने मोठा धुराळा उडाला. याबाबत प्रत्यक्षदर्शी डी. के. ठक्कर यांनी सांगितले की, आम्ही येथे उभे असतानाच अचानक वाड्याच्या भिंत कोसळली. त्यामुळे मोठा धुराळा उडाला. मात्र, त्यात कोणालाही काही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली