बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 01:25 PM2019-06-22T13:25:38+5:302019-06-22T13:29:21+5:30
जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे.
उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन चारा छावणी सुरू करण्यात आली असून, छावणीत दिवसेंदिवस जनावरांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. बत्तीसाव्या दिवशी १०४७ पर्यंत जनावरे दाखल झाली आहेत.
जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे. आज पाऊस पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी होता परंतु पाऊस पडण्याची चिन्हेच दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीत दाखल केली आहेत. छावणीत जनावरांना पशुखाद्य व हिरवा चारा तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने होत असल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले. जसजसा पाऊस लांबत आहे तस-तसा शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत असल्याने बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील शेतकरी चारा छावणीकडे धाव घेत आहेत. सध्या चारा छावणीत जनावरांचा आकडा १ हजाराच्या पुढे गेला आहे. पावसाच्या लांबणीमुळे अजून जनावरे वाढणार आहेत.
शेटफळगढे : छत्रपतीच्या मदतीला सोनाई धावणार आहे. छावणीवरील जनावरांना पाणीपुरवठा करण्यास मदत करण्याचे सुतोवाच सोनाई परिवाराचे व जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी केले. लाकडी (ता. इंदापूर) येथील छत्रपती कारखान्याने सुरू केलेल्या छावणीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी भेट दिली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून पशुधनाच्या दुग्धोत्पादनाची छावणीवर दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावर उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर समाधान व्यक्त केले. मात्र, या छावणीत जवळपास दीड हजार जनावरे दाखल झाली आहेत. याला सध्या पाणी कमी पडत आहे. यामुळे आणखी एक टँकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी या वेळी माने यांच्याकडे केली. यावर माने यांनी सोनाई परिवाराच्या वतीने प्रतिदिन २० हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे घोषित केले. यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या वेळी बोलताना माने म्हणाले, की सध्याचा दुष्काळ हा भीषण आहे. इंदापूर तालुक्यात छत्रपती कारखाना बाजार समिती तसेच सोनाई परिवार यांनी सुरू केलेल्या छावण्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर, दादा वणवे, महेश वणवे, शेतकरी व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.