पोलीस खात्याला १००० पुस्तकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:19+5:302021-06-02T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविड काळात खूप अवघड परिस्थितीत नागरिकांना विश्वास देत आपलं कर्तव्य पार पाडणा-या पुणे पोलिसांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड काळात खूप अवघड परिस्थितीत नागरिकांना विश्वास देत आपलं कर्तव्य पार पाडणा-या पुणे पोलिसांना रोहन प्रकाशन आणि पुण्यभूषण फाउंडेशन या दोन संस्थांतर्फे मंगळवारी (दि.१) एक विशेष पुस्तकभेट देण्यात आली. रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विनोदी साहित्यातील काही निवडक पुस्तकांच्या १००० प्रती या संस्थांतर्फे पोलीस खात्याला भेट देण्यात आल्या. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, लायन्स क्लबचे गव्हर्नर नाईक, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर उपस्थित होते.
गेल्या वर्षीपासून अत्यंत बिकट अशा कोविडच्या आपत्ती काळात पुणे पोलीस निग्रहाने, चिकाटीने आणि जबाबदारीने अविरत काम करत आहेत. नागरिकांची मन:स्थिती सांभाळत आणि वेळोवेळी त्यांना आश्वस्त करत, धीर देत पोलीस विभाग काम करत आहे. शहर अनुशासनाची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अनेकदा स्वत:चा जीवही धोक्यात घालून ते पार पाडत आहेत. वेळेची मर्यादाही त्यांच्या कामाच्या आड येत नाही. पोलीस खात्याच्या या कामाबद्दल कौतुक आणि आदर व्यक्त करण्यासाठी ही विशेष भेट देण्यात आली. पोलिसांच्या मनावरचा तणाव कमी करता यावा, यासाठी या दोन्ही संस्थांनी हे स्तुत्य पाऊल उचलले.
-------------------------------------------------