संरक्षण विभागासाठी डिक्कीचे १ हजार उद्योजक - अजयकुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:55 AM2019-02-09T01:55:40+5:302019-02-09T01:56:39+5:30
संरक्षण मंत्रालय येत्या काळामध्ये ५ हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करणार आहे. त्यासाठी दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) १ हजार पुरवठादारांना तयार केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी सांगितले.
पुणे - संरक्षण मंत्रालय येत्या काळामध्ये ५ हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करणार आहे. त्यासाठी दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) १ हजार पुरवठादारांना तयार केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी सांगितले.
संरक्षण मंत्रालय, डिक्की आणि एनएसआयसीच्यावतीने अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डिक्कीचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश जगताप, डिक्कीचे अवजड उद्योग विभागाचे प्रमुख अनिल होवाळे यावेळी उपस्थित होते.
अजयकुमार म्हणाले, की संरक्षण मंत्रालयाला सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी डिक्की हे एक मोठे व्यासपीठ आहे. त्याचा उद्योजकांनी फायदा घ्यावा. काही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे उद्योजक या क्षेत्रात येण्यास काहीसे साशंक होते. मात्र, आता तसे राहिले नाही. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ झाली आहे. उद्योजकांनी संरक्षण क्षेत्रातील गरजा ओळखून, त्याप्रमाणे पुरवठा करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. या क्षेत्रात सुमारे ७ हजार उद्योजक आहेत. येत्या काळात १ हजार डिक्की सदस्य या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविताना दिसतील.
तळागाळातल्या अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना एकत्र आणून या क्षेत्रातील यशस्वी व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यक्रमागील उद्देश असल्याचे कांबळे म्हणाले. या कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएल लिमिटेड पुणे, बीईएमएल लिमिटेड, माझगाव डॉक या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.