विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:55 AM2019-08-21T10:55:42+5:302019-08-21T11:00:56+5:30
पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहे.
पुणे : महापुरामुळे बाधित झालेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील रहिवाशांना मानसिक धीर देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १००० विद्यार्थी-विद्यार्थिनी आठवडाभर दहा गावांमध्ये जाणार आहेत.पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहेत.तसेच या गावांमध्ये स्वच्छता शिबिरांच्या माध्यमातून गाव स्वच्छ करणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले.अनेकांनी आपले पाळीव प्राणी गमावले आहेत.येथील शेकडो घरे पडली असून शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत लोकांना धीर देण्यासाठी विद्यापीठाचे एक हजार विद्यार्थी जाणार आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे यांच्यासह इतर सहका-यांच्या समन्वयाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठातर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपतकालीन भागातील नागरिकांना मदत केली जाते. सध्य स्थितीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना मदतीच्या हातांची गरज आहे.त्यामुळे पुणे विद्यापीठाचे एकूण एक हजार विद्यार्थी पुढील तीन ते चार महिने या भागात काम करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट केले जातील. सात-आठ दिवस काम केलेल्या विद्यार्थ्यांना परत बोलवले जाईल.त्यानंतर नवीन गटातील विद्यार्थ्यांना पाठविले जाईल.टप्प्या-टप्प्याने विद्यापीठाकडून एकूण एक हजार विद्यार्थी येथे काम करण्यासाठी जातील. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीने पुरग्रस्त भागाची पहाणी केली असून त्यानुसार मदतीचे नियोजन करण्यात आले आहे.
डॉ.संजय चाक णे म्हणाले, विद्यापीठाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी येत्या २२ ते २८ आॅगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील तेरवाड, राजापूर, राजापूर वाडी, टाकळी, आकिवट तसेच, सांगली जिल्ह्यातील वाळवा, बोरगाव, शिरगाव, भिलवडी, औदुंबर या गावांमध्ये जाणार आहेत. विद्यार्थी येथील पुरग्रस्तांशी बोलून त्यांची दु:खे समजून घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी समुपदेशन, पथनाट्य यांचा मार्ग अवलंबण्यात येणार येईल. याशिवाय गावातील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लाववतील.तसेच गावक-यांच्या लहान-मोठ्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या गोष्टींवरही विद्यार्थ्यांकडून भर दिला जाईल.