कोरोना बाधित रुग्णांसाठी ससूनमध्ये १०१ डॉक्टर व ७६ परिचारिकाची फौज २४ तास तैनात : डॉ.अजय चंदनवाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:07 PM2020-04-16T16:07:47+5:302020-04-16T16:16:10+5:30
नागरिकांनी अंगावर आजार काढू नये
पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने ससून सर्वोपचार रूग्णालय कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या येथे 82 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, 31 वरिष्ठ तज्ञ डॉक्टर्स, 70 निवासी डॉक्टर्स आणि तब्बल 76 परिचारिका व आरोग्य कर्मचारी टीम २४ तास कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंगावर आजार काढू नये कोणत्याही परिस्थितीत आजार अंगावर न काढता त्रास सुरू झाल्यास त्वरीत उपचार घेण्याचे आवाहन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांनी येथे केले. तसेच ससून रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सदैव तयार व सक्षम असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
याबाबत चंदनवाले यांनी सांगितले की, ससून सर्वोपचार रुग्णालयात 13 मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण दाखल करण्यात आला. सध्या 82 कोरोना बाधित व संशयित रूग्णांवर येथे उपचार सुरू आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांकरिता ससून रुग्णालय हे क्रिटीकल केअर सेंटर (Critical Care Centre) आहे. रुग्णांनी अंगावर आजार काढू नये, त्रास होत असेल तर त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही अफवा किंवा खोटया माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले
ससून सर्वोपचार रुग्णालय हे अतिविशेष उपचारांसाठीचे रुग्णालय असल्याने येथे सर्व गंभीर आणि अत्यवस्थ रुग्ण दाखल केले जातात. जे रुग्ण स्थिर आहेत, अशांना इतर रुग्णालयात उदा: नायडू रुग्णालय येथे ठेवले जाते. नायडू रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी ससून रुग्णालयातील तज्ञ आणि निवासी डॉक्टर 11मार्च पासून २४ तासांकरिता तैनात करण्यात आले आहेत. व हया रुग्णालयातील गंभीर रुग्णांना ससून रुग्णालयात संदर्भित केले जाते. अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी २४ तास निवासी डॉक्टरांसोबत वरिष्ठ प्राध्यापक देखील कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना बाधित रुग्णांवरील उपचार पध्दती ही महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, आयसीएमआर यांनी आखून दिलेल्या उपचार पध्दतीप्रमाणे केली जाते. ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचारी यात अहोरात्र कार्यरत आहेत. कोरोना बाधित रुग्णांना सुरुवातीला ससून रुग्णालयातील डेव्हीड ससून रुग्णालय इमारतीत उपचार करण्यात येत होते.
१३ एप्रिल २०२० पासून कोरोना बाधित रुग्णांना नवीन ११ मजली इमारतीत १०० खाटांचा विलगीकरण कक्ष व ५० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला असून या रुग्णांवर तेथे तातडीने उपचार करण्यात येत आहेत. या इमारतीत सर्व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी आवश्यक असे २१ व्हेंटीलेटर्स सध्या कार्यरत असून पुढे गरज भासल्यास ही संख्या ५० ते १५० पर्यंत वाढविण्याची क्षमता आहे. या नवीन ११ मजली इमारतीत ससून रुग्णालयासोबत खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणा-या तज्ञांना देखील कोरोना बाधित रुग्णांवरील उपचार करण्यासाठी सामावून घेण्यात आले आहेत. या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारे इतर तज्ञ उदा-हृदयरोगतज्ञ, मूत्रपिंड आजार तज्ञ, मेंदू रोग आजार तज्ञ हे ससून रुग्णालयात उपलब्ध असून २४ तास या रुग्णांसाठी उपचार करीत आहेत.
------
रुग्णालयात 'फ्ल्यू ओपीडी' सुरू
कोरोना संशयित रुग्णांसाठी "फ्ल्यू ओपीडी" नवीन ११ मजली इमारतीत स्वतंत्रपणे सुरु करण्यात आली असून, येथूनच कोरोनाच्या संशयित रुग्णांचे तपासणीसाठीचे स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात कोव्हीड-१९ आजारासंदभार्तील तपासणी आयसीएमआर आणि एनआयव्ही यांच्या मान्यतेने सुरु करण्यात आलेली आहे. आजतागायत येथे १२३३ तपासण्या करण्यात आल्या असून पुण्याबरोबरच सातारा, नगर व नाशिक या जिल्ह्यातीलही कोरोना संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्यात येत असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
--------
'मनसंवाद ' चा नागरिकांना धीर
कोरोना संशयित व बाधित रुग्णांसाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व मनोवृिकती शास्त्र विभागातर्फे"मनसंवाद" हेल्पलाईन क्र.०२०-२६१२७३३१ ही सर्व सामान्यांसाठी सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा रोज सरासरी २० लोक लाभ घेत आहेत. तसेच कोरोनासंदर्भातील सर्व शंकाचे निरसन करण्यासाठीही २४ तासांसाठी हेल्पलाईन (क्र.०२०-१८००२३३४१२० व ०२०-२६१०२५५०) सुरु करण्यात आली आहे. समाजप्रबोधनासाठी वेगवेगळया प्रकारची मार्गदर्शक पुस्तिका, भित्तीपत्रके तयार करुन वाटण्यात आली आहेत.