तळेगाव-शिक्रापूर महामार्गासाठी १ हजार १५ कोटी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:29+5:302021-07-29T04:10:29+5:30
सध्या तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर सध्याच्या पावसाने मोठमोठे खड्डे, त्यात भरलेले पाणी, भरधाव वेगात येणारी वाहने आणि खड्डे ...
सध्या तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर सध्याच्या पावसाने मोठमोठे खड्डे, त्यात भरलेले पाणी, भरधाव वेगात येणारी वाहने आणि खड्डे चुकविताना चालकांची होणारी दमछाक हे दृश्य बघण्यालायक झाले आहे. वाहनधारकांना जिवावर उदार होऊन या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. आता हीच होणारी कसरत लवकरच खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर संपणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५४ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी (५४८ बी) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून नूतनीकरण करण्यासाठी १ हजार १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसे अधिकृत पत्र मिळाले असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
या वर्षीच्या नोव्हेंबरअखेरीस या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. हा रस्ता चौपदरी लेनचा असणार आहे. त्यात मध्यभागी रस्ता दुभाजक असणार आहे. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खड्डे किंवा पावसाळ्यात पाणी साचते, त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता सिमेंटचा करण्यात येणार आहे. काही ठिकाणी अंडरग्राउंड रस्त्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचे असणाऱ्या महामार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळचे आमदार सुनील शेळके, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सविस्तर चर्चा केल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे.
२८ चाकण
चाकण-तळेगाव महामार्गावरील वाहतूककोंडी.