पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:29 PM2019-08-29T20:29:51+5:302019-08-29T20:33:11+5:30
किती वर्षे पक्षात आहात, राजकीय, सामाजिक कामांची पार्श्वभूमी, आतापर्यंत किती निवडणूका लढवल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुलाखतींमध्ये माहिती विचारण्यात आली..
पुणे : भारतीय जनता पाटीर्चे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे निरीक्षक आशिष शेलार यांनी पुणे शहरातील विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. ८ मतदारसंघांसाठी १०३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात विद्यमान आमदारांसह अनेक नगरसेवकांचा तसेच पक्षात नुकताच प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे.
पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात दुपारी १२ वाजता मुलाखतींना सुरूवात झाली. समर्थक कार्यकर्त्यांसह इच्छुक या मुलाखतींना उपस्थित होते. त्यामुळे पक्ष कार्यालय गजबजून गेले होते. शेलार यांनी सुरूवातीलाच मुलाखती आपण एकटेच घेणार आहोत असे स्पष्ट केले. त्यामुळे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट हे कार्यालयातच दुसऱ्या ºया खोलीत बसले होते. मतदारसंघानुसार इच्छुकांना बोलावून एकाच वेळी त्यांना प्रश्न विचारत या मुलाखती झाल्या. वैयक्तिपणे शेलार भेटतील व माहिती घेतील अशी इच्छुकांची अपेक्षा होती.
किती वर्षे पक्षात आहात, राजकीय, सामाजिक कामांची पार्श्वभूमी, आतापर्यंत किती निवडणूका लढवल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुलाखतींमध्ये माहिती विचारण्यात आली असे इच्छुक उमेदवारांबरोबर संपर्क साधला असता समजले. शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वात कमी म्हणजे ४ इच्छुक पर्वती मतदारसंघात होते. शहरातील सर्वच म्हणजे आठही मतदारसंघामध्ये भाजपाचेच आमदार आहेत. त्या सर्वांनीच आपापल्या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्या. त्यांच्याबरोबरच त्यात्या मतदारसंघातील नगरसेवक, पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
मुलाखतीनंतर तुमच्याबरोबर शहराध्यक्ष बोलतील असे सांगत आशिष शेलार माध्यम प्रतिनिधींबरोबर न बोलताच निघून गेले. मिसाळ यांनी सर्व मुलाखती शांततेत पार पडल्या असल्याचे सांगितले. आमदारांशिवाय अन्य जणेही मुलाखत देतात याचा अर्थच पक्षात लोकशाही आहे असे त्या म्हणाल्या, तुमच्या मतदारसंघात सर्वाधिक कमी इच्छुक आहेत असे लक्षात आणून दिल्यानंतर याचा अर्थ माझे काम चांगले आहे असे उत्तर त्यांनी दिले. खासदार बापट म्हणाले, पक्षसंघटनेत अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे असेच ही गर्दी सांगत आहेत. या मुलाखतींचा अहवाल शेलार प्रदेश शाखेकडे देतील. त्यानंतर तो निवड समितीकडे जाऊन केंद्रीय समिती त्यावर निर्णय करेल असे त्यांनी सांगितले.