ओशो आश्रमातील भूखंडांची १०७ कोटींना बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:37+5:302021-03-07T04:11:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून आश्रमाला ...

107 crore for plots in Osho Ashram | ओशो आश्रमातील भूखंडांची १०७ कोटींना बोली

ओशो आश्रमातील भूखंडांची १०७ कोटींना बोली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून आश्रमाला येत असलेल्या आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेतला असल्याचे ओशो आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल ओशो यांच्या भक्तगणांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा मोठा आश्रम आहे. या आश्रमाचे व्यवस्थापन व मालकी युरोपातील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे आहे. जगभरच्या ओशोप्रेमींचा येथे राबता असतो. या आश्रमातील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत.

या विक्रीसाठी परवानगी मिळावी म्हणून ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्यावतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. प्रत्येकी दीड एकर क्षेत्राचे हे दोन भूखंड असून ते रिकाम्या असल्याचे ‘ओशो इंटरनॅशनल’च्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. या भूखंड खरेदीसाठी तीन मोठ्या उद्योगपतींनी बोली लावली. यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया आणि ए टू झेड ऑनलाइन सर्विसेस यांचा समावेश आहे. उद्योगपती राजीव बजाज यांनी सर्वात मोठी बोली लावली आहे. बजाज यांचा बंगला याच भूखंडाशेजारी आहे. बजाज यांनी तब्बल १०७ कोटी रुपयात हे भूखंड खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यानंतर विक्री व्यवहार पूर्ण होणार आहे.

चौकट

ओशो प्रेमी करतील मदत

“ओशो आश्रमचे दोन भूखंड १०७ कोटी रुपयांत विकणार आहेत. मात्र, ही ओशोच्या भक्तांची जागा आहे. जगभरच्या ओशो अनुयायांनी ती निर्माण केली. येथे ओशोंची समाधी आहे. कोविड काळात आश्रम बंद होते. त्यामुळे आश्रमाचा खर्च उचलणे अवघड असल्याने आम्ही भूखंड विकत असल्याचे सांगितले जाते. ओशो आश्रम अडचणीत असेल तर तुम्ही अनुयायांकडे या. ते नक्कीच आर्थिक मदत करतील.”

- योगेश ठक्कर, ओशो अनुयायी.

चौकट

भूखंड विकण्याचे षडयंत्र

“पुण्यातील ओशो आश्रमाचे भूखंड विकणे हे षडयंत्र आहे. ओशोंच्या आश्रमाचे सर्व हक्क स्वित्झर्लंड येथील मुख्यालयाकडे आहेत. त्या ठिकाणच्या ट्रस्टचे नावही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आहे. त्यांचे एका वर्षाचे आर्थिक उत्पन्न ४० ते ५० कोटी रुपये असल्याचे त्यांनी खूप वर्षांपूर्वी सांगितले होते. आता तर त्यात नक्कीच वाढ झाली असेल. तेच भारतात आले तर भूखंड विकण्याची गरज भासणार नाही. आम्ही ओशोंच्या आश्रमाचे भूखंड अजिबात विकू देणार नाही. त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात लढा देणार आहोत,” अशी प्रतिक्रीया एका ओशो अनुयायाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: 107 crore for plots in Osho Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.