दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट पाच हजाराची मदत ; महापालिकेची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 09:37 PM2018-04-06T21:37:05+5:302018-04-06T21:37:05+5:30
महापालिका हद्दीतील इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
पुणे: शहरातील खासगी शाळांमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेणा-या व एक लाखांच्या आता आर्थिक उत्पन्न असणा-या सर्वच प्रवर्गांतील मुलांना आता सरसकट पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनाचा सुधारित प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि.१०) रोजी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्थायी समिती याबाबत काय निर्णय घेते याकडे शहरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिका हद्दीतील इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, नववी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीसाठी खासगी शिकवणी घेता येत नाही.आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये व किमान शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी महापालिकेच्या वतीने मदतीचा हात दिला जातो. यामुळेच महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांना २ ते ५ हजार रुपये दिले जातात. त्यात खुल्या गटासाठी दोन आणि मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येतात. अशा योजनांसाठी विशेष तरतूद केली जाते. दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने यापुढे सर्वच प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे अभिप्राय पाठविला आहे.
-------------------------
महापालिकेच्या हद्दीतील सर्वसामान्य घरातील मुलांना देखील आपले शालेय शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव अआला आहे. या प्रस्तावावर सर्व पातळ्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ.
योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती
-------------
सरसकट पाच हजार मदत करण्यासाठी केवळ २० लाख वाढीव तरतुद गरजेची
वाढत्या खर्चामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेणे देखील कठीण होते. या पार्श्वभमीवर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या काही योजनांमध्ये कालानुसार काही किरकोळ बदल करणे आवश्यक आहे. हे बदल केल्यास शहरातील सारखी परिस्थिती असलेल्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपये मिळणे शक्य होणार आहे. यामुळे महापालिकेवर वर्षांला केवळ २० लाख रुपयांचा भार पडणार आहे.
राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती