दहावीची परीक्षा रद्द; शुल्काचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:59+5:302021-05-21T04:09:59+5:30
राज्यातील तब्बल १६ लाख २०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यातील पुणे विभागामधील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ...
राज्यातील तब्बल १६ लाख २०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यातील पुणे विभागामधील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ७१ हजार ५०३ एवढी आहे. पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची संख्या २०६८ एवढी असून मागील वर्षी १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.
इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली, तरी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शासनाकडून सीईटी परीक्षेचा विचार केला जात आहे. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देऊ नये, अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच, परीक्षा घेतल्या जाणार नसतील तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी केले जात आहे.
----------------------
दहावीच्या परीक्षा शुल्काच्या संदर्भात राज्य शासनाकडून अद्याप कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या
आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- अपर्णा वाखारे, माध्यमिक, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
-------------------
परीक्षाच घेतल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्यायला हवे. तसेच, नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शुल्कही परत द्यावे.
- सीमा उत्तेकर, विद्यार्थी
----------------------
परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणे उचित ठरत नाही. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच हव्यात. परीक्षा घेतल्या जाणार नसतील तर विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे.
-विशाल रणपिसे, विद्यार्थी,
------
राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ४१५ रुपये परीक्षा शुल्क घेते, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागते आहे. यंदा दहावीच्या तब्बल १६ लाख २०६ विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे मंडळाकडे जवळपास ६६ कोटी ४० लाख ८५ हजार परीक्षा शुल्क यंदा जमा झाले आहे.