१० वीची परीक्षा २ मार्चपासून, बोर्डाकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीटबाबत महत्त्वाची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:14 PM2023-02-03T22:14:49+5:302023-02-03T22:15:31+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट येत्या सोमवारपासून (६ फेब्रुवारी) मिळणार आहे.
पुणे - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षांचे वेध लागले आहेत. त्यातच, महाराष्ट्र राज्य मंडळाची यंदाची दहावीच्या परीक्षेला २ मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची तयारी सुरू असून बोर्डाकडूनही विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट आणि नंबर देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार https://www.mahasscboard.in या वेबसाइटवर शाळा लॉगइनमध्ये विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाईल. येत्या सोमवारपासून म्हणजे ६ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट घेता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट येत्या सोमवारपासून (६ फेब्रुवारी) मिळणार आहे. शाळांनी संबंधित हॉल तिकीट डाउनलोड करून, त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची असून, प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये, अशी सूचना राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
बोर्डाने दिलेल्या सूचनांनुसार, हॉल तिकीट डाउनलोड झाल्यावर शाळांनी मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असल्यास संबंधित दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायच्या आहेत. हॉल तिकीटावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करायची आहे. त्यानंतर त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे, असे सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, अशीही माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे