बनावट वेबसाईट तयार करुन ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

By विवेक भुसे | Published: May 8, 2023 11:36 PM2023-05-08T23:36:25+5:302023-05-08T23:37:13+5:30

टीईटीनंतर मोठा घोटाळा उघड: छत्रपती संभाजीनगरच्या टोळीचा कारनामा.

10th pass certificate was given to 700 people by creating a fake website in pune | बनावट वेबसाईट तयार करुन ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

बनावट वेबसाईट तयार करुन ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: बनावट शैक्षणिक प्रमाण पत्र बनविणार्‍या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुलसारखी बनावट वेबसाईट बनवून त्याद्वारे तब्बल ७०० जणांना दहावी पासचे बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावी पासच्या प्रमाणपत्राला ६० हजार रुपये लागतील असे सांगितले. बनावट ग्राहकाने ३९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर उरलेले १६ हजार रुपये घेण्यासाठी संदीप कांबळे हा स्वारगेटला आला असता त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या तिघांना अटक केली.

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल सुरु करण्यात आली आहे. या टोळीने त्यांच्यासारखीच दिसेल अशी वेबसाईट २०१९ पासून सुरु केली. या टोळीने दहावी पास असलेल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात ३५ जणांना त्यांनी १० वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. या वेबसाईट व त्यांच्या कारनाम्याची तपासणी केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत ७०० जणांना अशा प्रकारे बनावट १० वी, १२ वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे.

हे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी एजंट नेमले होते. संदीप कांबळे याच्यासारखे एजंट ज्यांना १० वी पासचे प्रमाणपत्र गरजेचे आहे, अशांशी संपर्क साधत. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये घेतले जात होते. नोकरी, व्यवसाय, कर्ज तसेच अन्य कामांसाठी दहावी पास ही अट ठेवली असल्याने अनेक जण इतके पैसे देऊन हे प्रमाणपत्र घेत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करीत आहेत.

Web Title: 10th pass certificate was given to 700 people by creating a fake website in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.