दहावी उत्तीर्णही होणार उपकुलसचिव !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:29 AM2018-09-15T02:29:21+5:302018-09-15T06:19:01+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ठरविले पदोन्नतीचे नवे नियम

10th Passing Vice-Chancellor! | दहावी उत्तीर्णही होणार उपकुलसचिव !

दहावी उत्तीर्णही होणार उपकुलसचिव !

googlenewsNext

- दीपक जाधव 

पुणे : देशात शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पदांसाठीच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये वाढ होत आहे. बहुसंख्य अधिकारी पदांसाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दहावी उत्तीर्णांनाही पदोन्नतीने उपकुलसचिव बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात दहावी पास शिपाई आणि दहावी पास उपकुलसचिव एकत्र काम करताना दिसतील.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कनिष्ठ सहायक ते उपकुलसचिव पदी पदोन्नती होण्यासाठीची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये प्रत्येक पदाच्या पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव यांचे नियम त्यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार दहावी उत्तीर्ण होऊन कनिष्ठ सहायक म्हणून विद्यापीठात रुजू झाल्यास अवघ्या १८ वर्षांच्या सेवेनंतर तो उपकुलसचिव बनू शकणार आहे.

कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी, सहायक कुलसचिव, उपकुलसचिव, स्वीय सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षारक्षक, शिपाई, दफ्तरी आदी पदांच्या पदोन्नतीची नियमावली जाहीर केली आहे. ही सर्व पदे दोन पद्धतींनी भरली जातात. एक सरळ सेवा व दुसरी विभागीय पदोन्नती. नव्या नियमावलीनुसार ५० टक्के पदे सरळ सेवा प्रवेशाने, तर ५० टक्के पदे विभागीय पदोन्नतीने भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर विद्यापीठांमध्ये वयाची अट
राज्यातील इतर काही सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पदोन्नतीसाठी विशिष्ट वयाची अट घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथे दहावी उत्तीर्ण व्यक्तींना उपकुलसचिव पदापर्यंत पोहोचता येत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मात्र वयाची अट घालण्यात न आल्याने इथे दहावी उत्तीर्णांना उपकुलसचिव होता येईल.

विद्यापीठ प्रशासनाचे मौन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्याशी दूरध्वनी व मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

दहावी उत्तीर्ण असलेला कनिष्ठ सहायक ३ वर्षांच्या अनुभवानंतर वरिष्ठ सहायक बनू शकणार आहे. त्यानंतर पुन्हा ३-३ वर्षांच्या सेवेनंतर सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी, सहायक कुलसचिव अखेर उपकुलसचिव तो बनू शकेल. केवळ सहायक मागील ५ वर्षांचा वार्षिक गोपनीय अहवाल समाधानकारक, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र, मागासवर्गीयांसाठी जातवैधता प्रमाणपत्र, मालमत्ता व दायित्वे यांचे वार्षिक विवरण एवढी कागदपत्रे सादर केल्यास दहावी उत्तीर्ण कर्मचाऱ्याला उपकुलसचिव बनण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पदोन्नतीच्या या नव्या नियमावलीमध्ये केवळ दहावी उत्तीर्ण कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, पदव्युत्तर शिक्षण घेऊन एमफिल, पीएचडी झालेल्या कर्मचाºयांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. या नव्या नियमावलीमुळे आमच्या या पदव्यांचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

पदोन्नतीच्या नव्या नियमावलीची पडताळणी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी जाहीर केलेल्या पदोन्नतीच्या नव्या नियमावलीची पडताळणी केली जाईल. शासकीय कायदे व नियमांच्या चौकटीत ही नियमावली बसते का, याची तपासणी केली जाईल. - धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग

Web Title: 10th Passing Vice-Chancellor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.