SSC Result 2023:दहावीचा एक तास आधीच निकाल मिळू लागला, पण मंडळ म्हणतं अफवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:47 PM2023-06-02T12:47:27+5:302023-06-02T12:57:41+5:30
Maharashtra Board SSC Result 2023 नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले
अतुल चिंचली
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर हाेणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले हाेते. अखेर मुहूर्त लागला असून, शुक्रवारी (दि. २) दुपारी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर हाेणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना हे पाहता येणार आहे.
परंतु एका माध्यमाच्या वेबसाईटवर निकाल एक तास अगोदर १२ वाजल्यापासून पाहायला मिळत आहे. लोकमतने त्या वेबसाईटवर पाहणी केली असता हि माहिती समोर आली आहे. त्यावरून लोकमतच्या प्रतिनिधींनी शिक्षण अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी हा निकाल फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच नागरिकांनी अधिकृत वेबसाइटवरून निकाल घ्यावा असे सांगण्यात आले आहे.
राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्च २०२३ दरम्यान पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नऊ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ लाख ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश हाेता.
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या निकालाबराेबर इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध हाेणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत दि. १४ जून राेजी दुपारी ३ नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल
१. www.mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://ssc.mahresults.org.in
विद्यार्थ्यांना वरील अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येईल. विषयनिहाय किती गुण टक्के मिळाले आहेत हे पाहून गुणांची प्रिंट आउटदेखील घेता येईल.