10th Supplementary Exam Result: पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातून २९. ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:43 PM2023-08-29T12:43:04+5:302023-08-29T12:43:35+5:30
लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ५१.४७ टक्के लागला आहे. तर पुणे विभागीय मंडळाचा निकाल सर्वांत कमी २२.२२ टक्के लागला
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल २९. ८६ टक्के लागला असून, राज्यातील १३ हजार ४७८ विद्यार्थी अकरावीमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. बारावीप्रमाणेच दहावीच्या पुरवणी परीक्षेतही लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ५१.४७ टक्के लागला आहे. तर पुणे विभागीय मंडळाचा निकाल सर्वांत कमी २२.२२ टक्के लागला आहे.
या परीक्षेत एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३१९ एवढी आहे. तरीही एटीकेटी सवलतीद्वारे हे विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. राज्य मंडळातर्फे १८ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. राज्यात परीक्षेदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे काही विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणपत्रक डाऊनलोड करून त्यांची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी , उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आकडे काय सांगतात?
राज्यातील एकूण मंडळे : ९
पुरवणी परीक्षेसाठी नाेंदणी केलेले विद्यार्थी : ४९ हजार ३७७
परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ४५ हजार १६६
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : १३ हजार ४७८
राज्यातील उत्तीर्णचे प्रमाण : २९.८६ टक्के
परीक्षेत कॉपीचे प्रमाण कमी
परी़क्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली होती. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे कॉपीचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. औरंगाबादमध्ये 7 तर नाशिक -१ हे विभाग वगळता इतर सहा विभागांमध्ये कॉपीचे प्रमाण शून्य आहे.
विभाग मंडळनिहाय दहावीच्या निकालाची आकडेवारी
पुणे - २२.२२
नागपूर - ४१.९०
औरंगाबाद - ३७.२५
मुंबई - १५.७५
कोल्हापूर - २९.१८
अमरावती - ४३.३७
नाशिक -४१.९०
लातूर - ५१.४७
कोकण - २७.०३