बांधकाम व्यावसायिकाची ११ कोटींची फसवणूक; भागीदारांनी ६२ दुकाने परस्पर केली नावावार
By नारायण बडगुजर | Published: August 29, 2023 06:22 PM2023-08-29T18:22:14+5:302023-08-29T18:23:05+5:30
भागीदारीच्या प्रकल्पातील ६२ दुकाने परस्पर नावावर करून घेतली...
पिंपरी : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीचा संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. भागीदारीच्या प्रकल्पातील ६२ दुकाने परस्पर नावावर करून घेतली. यात बांधकाम व्यावसायिकाची ११ कोटी २३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. भोसरी येथे २४ मे रोजी हा प्रकार घडला.
प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय ५३, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २८) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत मणिलाल संघवी (वय ५५), संदेश मिश्रीलाल चोपडा (वय ५४), प्रमोद भाईचंद रायसोनी (तिघे रा. जळगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत संघवी, संदेश चोपडा आणि प्रमोद रायसोनी यांनी संगनमत करून फिर्यादी प्रदीप कर्नावट यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी पी ३ डेव्हलपर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रसन्न गोल्डफिल्ड या प्रकल्पातील ६२ दुकाने त्यांच्या स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली. फिर्यादी कर्नावट यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्तानचांद कासवा, संजय रमणभाई पटेल यांना आगाऊ रक्कम घेऊन काही दुकानांची विक्री केली होती.
संघवी, चोपडा आणि रायसोनी यांनी ११ वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करून ६२ दुकाने त्यांच्या संस्थेच्या नावावर केली. त्यात फिर्यादी कर्नावट यांनी विक्री केलेल्या १६ दुकानांचा समावेश आहे. संघवी, चोपडा आणि रायसोनी अधिकार नसताना ११ कोटी २३ लाख २० हजार रुपयांचा अपहार करून ६२ दुकाने, ऑफिसेस स्वत: च्या वैयक्तिक फायद्यासाठी स्पेक्ट्रम रियालिटी भागीदारी संस्थेच्या नावावर करून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.