११ कोटींच्या कामात गैरप्रकार; पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा, सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 09:39 AM2024-06-12T09:39:37+5:302024-06-12T09:40:20+5:30
पुणे शहर व उपनगर सध्या झालेल्या पावसाने रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले
कात्रज : ड्रेनेज, पावसाळी लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा-पुन्हा रस्ते खुदाई नको आहे. पुणे शहर व उपनगर सध्या झालेल्या पावसाने रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून, पावसाळीपूर्व ११ कोटींच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून, याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत पालिका प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळे यांनी ताशेरे ओढले.
कात्रज ते नवले पूल बाह्यवळण महामार्ग व वंडरसिटी ते माउलीनगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. कात्रज विकास आघाडीच्या मदतीने कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू, असा विश्वास देखील नवनिर्वाचित खासदार सुळे यांनी व्यक्त केला. कात्रज विकास आघाडीकडून अध्यक्ष नमेश बाबर यांनी कात्रजच्या विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी खासदार सुळे यांना बोलावण्यात आले होते. यावेळी नमेश बाबर यांनी उड्डाणपुलाच्या कामाला गती द्यावी, चौकातील गुगळे प्लॉट जागा हस्तांतरण व रस्ता रुंदीकरण, जेएसपीएम कॉर्नर कलव्हर्ट व सेवा रस्ता समस्यांची माहिती देत लक्ष घालण्याची मागणी केली.
पुणे शहरात सातत्याने गुन्हे, ड्रग्ज प्रकार वाढत आहेत. तसेच मूलभूत सुविधा व विकासकामात पालिका प्रशासन कमी पडत आहे. यावरून पुण्यात पालिका व पोलिस प्रशासन नक्की आहे की नाही समजत नाही. वेळ आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. -सुप्रिया सुळे, खासदार